उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील एका 19 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लव पटेल असे मृत तरुणाचे नाव असून तो बीएचे शिक्षण घेत होता. घरात असताना त्याच्या वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडली गेली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेपूर्वी त्याने मोबाईलवर एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
झाशी जिल्ह्यातील गुरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगार गावात रविवारी, 25 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे वृत्त आहे. लव पटेल हा 19 वर्षांचा विद्यार्थी होता आणि तो आपल्या वडिलांसोबत राहत होता. घटनेच्या वेळी त्याचे वडील मुन्नालाल पटेल आणि कुटुंबातील अन्य सदस्य शेतावर गेले होते. घरातून गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी वडिलांना माहिती दिली. घरात पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी लवला तातडीने आरोग्य केंद्रात नेले; मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.
लवच्या मोबाईलमध्ये घटनेपूर्वी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आढळल्याचे वृत्त आहे. या व्हिडिओमध्ये त्याने वडिलांशी भावनिक संवाद साधला आणि पैशांचा उल्लेख केला होता. आईच्या छायाचित्राकडे निर्देश करत त्याने तिच्याबद्दलही भावना व्यक्त केल्याचे वृत्तांत नमूद आहे. या व्हिडिओमधील वक्तव्यांवरून मृत्यूमागील कारण निश्चित करता येत नाही. त्याने नेमक्या कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
लवच्या आईचा मृत्यू 2009 मध्ये झाला होता. त्यानंतर तो वडिलांसोबत राहत होता. आईच्या मृत्यूचा त्याच्यावर भावनिक परिणाम झाला होता का?, याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
लव तणावात राहत होता आणि त्याला झोप न लागण्याची समस्या होती. त्याच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. मात्र, त्याच्या मानसिक आरोग्याची नेमकी स्थिती, उपचार सुरू होते का आणि या बाबींचा घटनेशी काही संबंध होता का, याबद्दल माहिती समोर आली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरसराय पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले असून वडिलांच्या परवानाधारक शस्त्रासह मोबाईलमधील व्हिडिओचीही तपासणी केली. शवविच्छेदन आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत असून लवच्या मृत्यूमागील नेमके कारण काय?, याचा तपास पोलीस घेत आहेत.