बिहारमधील मोकामाचे जनता दल युनायटेड म्हणजेच 'जेडीयु'चे आमदार अनंत सिंह यांच्या धाकटी कन्या शिवांगी सिंह 26 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. शिवांगींचं लग्न ऋषिकेश कुमार उर्फ अंकित कुमारसोबत होत आहे. शिवांगीच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे वडील 2.50 कोटी रुपयांची लँड रोव्हर कार भेट देणार आहेत. या लग्नातील महागड्या भेटीमुळे उत्तर प्रदेशमधील अमरोहाचे भारतीय जनता पार्टीचे खासदार कवंर सिंह तंवर यांचे सुपुत्र ललित तंवर यांच्या लग्नाची सर्वांना आठवण झाली आहे. या लग्नामध्ये नवरदेवाला चक्क 33 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर भेट देण्यात आलं होतं.
कोण आहे नवरदेव?
ऋषिकेश कुमारने अमेरिकेतील अटलांटा येथील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. त्यांचे वडील रणविजय कुमार सिंह हे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. हे लग्न 25 नोव्हेंबर रोजी अनंत सिंह यांच्या मोकामा येथील मूळ गाव असलेल्या लदमा येथे पार पडणार आहे.
150 पदार्थ, मुलाला बीएमडब्यू कार अन्...
या लग्नासाठी आमदार अनंत सिंह कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. या लग्नामध्ये जवळपास 10 बिगा जमिनीवर भलामोठा मंडप घालण्यात आला आहे. पाहुण्यांसाठी 150 प्रकारचे पदार्थ जेवणामध्ये उपलब्ध असतील. अनंत सिंह हे आपल्या होणाऱ्या जावयला जवळपास अडीच कोटींची लँड रोव्हर डिफेंडर कार भेट देणार आहेत. याच कार्यक्रमादरम्यान अनंत सिंह यांचा धाकटा मुलगा अभिनव सिंह यांच्या मुंजीचा कार्यक्रमही होणार आहे. अनंत सिंह आपल्या मुलाला बीएमडब्यू कार भेट देणार आहेत. अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभा खासदार, माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार, लालू प्रसाद यादव यांच्यासहीत अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
अनेकांना आठवलं आमदार, खासदाराच्या घरातलं ते लग्न
अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी पाहून अनेकांना उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे 2011 साली अमरोहाचे खासदार कंवर सिंह तंवर यांच्या मुलाचं लग्न आठवणलं. हरियाणाचे माजी आमदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांच्या मुलीला सून म्हणून घरी आणताना खासदार कंवर सिंह तंवर यांनी पाण्यासारख्या पैसा खर्च केला होता. या लग्नासाठी शेकडो कोटी खर्च केल्याचं सांगितलं जातं. कंवर सिंह यांचा मुलगा ललित तंवरचं लग्न सुखबीर सिंग जौनापुरिया यांची मुलगी योगितासोबत झालं होतं.
हुंड्यात दिलं 33 कोटींचं हेलिकॉप्टर
आमदाराची मुलगी आणि खासदाराच्या मुलाच्या लग्नासाठी करण्यात आलेला खर्च पाहून अनेकांचे डोळे पांढरे पडले होते. सुखबीर सिंग यांनी ललित कंवर यांना हुंडा म्हणून 33 कोटी रुपयांचं 'बेल 429' हेलिकॉप्टर दिलं होतं. लग्नाच्या वेगवेगळ्या विधींदरम्यान नवरदेवाच्या कुटुंबाला 2.5 कोटी रुपये रोख रक्कम दिली होती. तसेच भेट वस्तूंवर एक कोटी रुपये खर्च केले होते.
तीन हजार पाहुण्यांना चांदीची बिस्कीटं
या लग्नाला उपस्थित राहिलेल्या तीन हजार पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून चांदीची बिस्कीटं देण्यात आली होती. तसेच सफारी सूटचं कापड आणि 11 ते 40 हजार रूपये शगुनचे पैसे म्हणून देण्यात आलेले. वेगवेगळ्या वृत्तांनुसार या लग्नासाठी 150 ते 250 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले.