राम मंदिरातील चोरी प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा खळबळ? काशी विश्वनाथ मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेला?
काशी विश्वनाथ मंदिर हे भारतातील उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) या प्राचीन शहरात गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले भगवान शिव यांना समर्पित एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. या मंदिराच्या सोन्याचा कळस चोरीला गेल्याचा आरोप आहे.
अयोध्येतील राम मंदिरामधील चोरी प्रकरणानंतर आता उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. वाराणसीतील वकील नित्यानंद राय यांनी मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या वरच्या भागातील दोन सुवर्ण कलश गायब झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच अन्य 8 ते 10 ठिकाणांवरील सोनंही गायब असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र मंदिर व्यवस्थापनाने हे आरोप पूर्णतः तथ्यहीन, निराधार आणि भ्रामक असल्याचे सांगत फेटाळले आहेत.
नेमका आरोप काय?
वाराणसीतील तेलियाबाग येथील वकील तथा बार असोसिएशनचे माजी महामंत्री नित्यानंद राय यांनी सप्टेंबर 2026 मध्ये पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, मंडलायुक्त, जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाला विश्वनाथ मंदिरातील सोन्यासंदर्भातील तक्रार केली. राय यांच्या मते मंदिराच्या शिखरावर (विशेषतः उत्तर द्वाराच्या वर आणि गर्भगृहावरील वायव्य कोनात काही सुवर्ण कलश किंवा सोनेरी प्लेटिंग गायब झालं आहे. त्या जागी आता रंग केल्याचे दिसत असून त्यांनी 8 ते 10 ठिकाणांचा उल्लेख करत सोनं गायब झाल्याचा दावा केलाय. त्यांनी श्वेतपत्रिका (व्हाइट पेपर) काढण्याची मागणी केली आहे. तसेच सदर प्रकरणामध्ये सखोल चौकशी, सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी राय यांनी केली आहे. पूर्वीच्या चोरीच्या घटनांचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
मंदिर प्रशासनाचं म्हणणं काय?
मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, एप्रिल 2026 मध्ये मंदिराच्या वायव्येकडील एक शिखर क्षतिग्रस्त झाले होते. हे शिखर पूर्णतः सुरक्षित असून, ते मंदिराच्या लॉकअपमध्ये सुरक्षित ठेवले असल्याचं मंदिर व्यवस्थापनाने सांगितलं. श्री काशी विश्वनाथ मंदिर न्यास आणि वाराणसी मंडलायुक्त एस. राजलिंगम यांनी बुधवारी, 14 ऑक्टोबर 2026 रोजी अधिकृत निवेदन जारी करून आरोप पूर्णपणे निराधार, भ्रामक आणि तथ्याशी विसंगत असल्याचे सांगितले.
सोने गायब झालेले किंवा चोरी झालेले नाही
एप्रिल 2026 मध्ये मुख्य मंदिराच्या गर्भगृहावरील वायव्य कोनातील कळसाचा एक भाग क्षतिग्रस्त झाला होता. तो क्षतिग्रस्त भाग मंदिराच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवला आहे. सोने गायब झालेले किंवा चोरी झालेले नाही. मुख्य कार्यपालक अधिकारी सत्यम मिश्र यांनीही हे स्पष्ट केले आहे.
आयआयटी मद्रासची घेणार मदत
या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी, आयआयटी मद्रासची एक विशेष टीम नोव्हेंबर 2026 मध्ये पुन्हा मंदिराची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर तज्ञ टीमकडून सादर करण्यात येणाऱ्या अहवालातील शिफारशींच्या आधारावर मंदिर न्यास पुढील कारवाई करेल. काशी विश्वनाथ मंदिर हे धार्मिक तसेच ऐतिहासिक आणि पुरातत्वीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे.