SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹50 हजारांपर्यंत मदत! फक्त 4% व्याज; कोणाला मिळणार?

महिला समृद्धी योजना ही सर्व महिलांसाठी सरसकट लागू नाही. अधिकृत माहितीनुसार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 01, 2026, 06:08 PM IST | Updated: Oct 01, 2026, 06:20 PM IST
Image Credit: स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण असलेल्या महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून आर्थिक सहाय्याची योजना राबवली जाते. ‘महिला समृद्धी योजना’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदानाच्या माध्यमातून ₹50 हजारांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. या योजनेतील कर्जावर 4 टक्के व्याजदर असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
Join

स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण असलेल्या महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून आर्थिक सहाय्याची योजना राबवली जाते. ‘महिला समृद्धी योजना’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदानाच्या माध्यमातून ₹50 हजारांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. या योजनेतील कर्जावर 4 टक्के व्याजदर असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

कोणत्या महिलांना मिळतो योजनेचा लाभ?

महिला समृद्धी योजना ही सर्व महिलांसाठी सरसकट लागू नाही. अधिकृत माहितीनुसार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आणि साधारणपणे 18 ते 50 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. अर्जदाराला निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान किंवा अनुभव असणेही अपेक्षित आहे.

₹50 हजारांची मदत नेमकी कशी मिळते?

या योजनेत ₹50 हजारांची संपूर्ण रक्कम अनुदान म्हणून दिली जात नाही. अधिकृत माहितीनुसार ₹40 हजार कर्ज आणि ₹10 हजार अनुदान, अशा स्वरूपात एकूण ₹50 हजारांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. या कर्जावर 4 टक्के व्याजदर लागू आहे. त्यामुळे ‘₹50 हजार मोफत मिळणार’ असा अर्थ घेणे चुकीचे ठरेल.

उत्पन्नाची अटही महत्त्वाची

योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पुरेशी नाही. अधिकृत माहितीनुसार अर्जदाराच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचीही मर्यादा आहे. ग्रामीण भागासाठी ₹98 हजार, तर शहरी भागासाठी ₹1.20 लाखांपर्यंत उत्पन्नाची मर्यादा नमूद करण्यात आली आहे. काही राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी ₹1 लाखांपर्यंतची उत्पन्न मर्यादा नमूद आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाकडून किंवा अन्य सरकारी उपक्रमातून संबंधित आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

योजनेच्या अधिकृत माहितीनुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी पुरावा ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. रहिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वीज बिल यांसारखी कागदपत्रे स्वीकारली जाऊ शकतात. व्यवसायाच्या स्वरूपानुसार अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

अर्ज कुठे करायचा?

महिला समृद्धी योजनेसाठी अर्जाचा नमुना संबंधित महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आहे. अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात सादर करायचा आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून सध्याची पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया तपासणे महत्त्वाचे आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES