मला मेहुणीशी लग्न करायचंय असँ म्हणून कोणी हट्ट करत असेल तर काय करायचं? एका तरुणाने असा हट्ट करत तो गावच्या पाण्याच्या टाकीवर चढला. सारे गावकरी आणि पोलीस त्याला 3 तास समजावत होते. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील एका गावात कौटुंबिक वादातून विचित्र प्रकार घडला. मेहुणीशी लग्न करण्याची मागणी मान्य होत नसल्याने 35 वर्षीय बाबू नावाचा तरुण 14 नोव्हेंबर रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढला. त्याला टाकीवर चढलेले पाहून गावात एकच खळबळ उडाली. काही वेळातच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली. तरुण खाली उतरण्यास तयार नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
बाबू हा कन्नौजमधील इंदरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूरा राय गावचा रहिवासी आहे. त्याचे लग्न मैनपुरी जिल्ह्यातील एका तरुणीशी झाले होते. सुमारे वर्षभरापूर्वी पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत गेली. त्यानंतर बाबू अस्वस्थ होता आणि त्याने पत्नीच्या कुटुंबीयांकडे तिच्या बहिणीशी म्हणजेच आपल्या मेहुणीशी लग्न लावून देण्याची मागणी सुरू केली. मात्र या मागणीला सासरच्या मंडळींनी विरोध केला.
अमर उजालाच्या वृत्तानुसार, बाबू शुक्रवारी आपल्या सासरी गेला होता. तेथे त्याने मेहुणीशी लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, सासरच्या मंडळींनी त्यास नकार दिला. यावेळी त्याला मारहाण करून घरातून बाहेर काढल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, शनिवारी काकाने मारहाण केल्याचा आरोप बाबूने केला. या वादानंतर तो गावात परतला आणि पाण्याच्या टाकीवर चढला. या मारहाणीच्या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप उपलब्ध नाही.
तरुण टाकीवर चढल्याची माहिती मिळताच डायल 112 पथक आणि इंदरगढ पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार यांनीही परिस्थिती हाताळली. पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.पण मेहुणीशी लग्न लावून देण्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय खाली उतरणार नसल्याची भूमिका त्याने घेतली. अखेर जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याला सुरक्षित खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
बाबू याची असा स्टंट करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील बाबूने असे कारनामे केले आहेत. त्याने यापूर्वीही झाडावर आणि पाण्याच्या टाकीवर चढून गोंधळ घातला होता. तसेच सासरी असताना गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी त्याला सुरक्षित खाली उतरवल्यानंतर ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.