मेरठमधील कुप्रसिद्ध निळा ड्रम प्रकरणी फाशीची शिक्षा! कोर्टाने मुस्कान आणि साहिलला सुनावला मृत्यूदंड
मेरठमधील गाजलेल्या निळा ड्रम हत्या प्रकरणी आरोपी मुस्कान आणि साहिल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे
मेरठमधील गाजलेल्या निळा ड्रम हत्या प्रकरणी कोर्टाने अखेर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषी असलेल्या मुस्कान आणि साहिल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल यांनी मुस्कानच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवला होता. या गुन्ह्यासाठी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने या दोघांनाही अत्यंत गंभीर गुन्हेगार मानले आणि त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. याव्यतिरिक्त, न्यायालयाने त्यांच्यावर अनुक्रमे 50 हजार आणि 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. महाभारताचा संदर्भ देत न्यायालयाने नमूद केले की, गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देणे हे 'धर्म'आहे आणि शिक्षा ही गुन्ह्याच्या तीव्रतेशी सुसंगत असायला हवी.
न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी मुस्कान रस्तोगी आणि साहिल यांना दोषी ठरवले होते. जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला होता आणि शिक्षा सुनावण्यासाठी 14 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. विशेष म्हणजे, सौरभ राजपूत यांच्या हत्येचा खटला जुलै 2025 मध्ये सुरू झाला होता. सुमारे 13 महिन्यांच्या न्यायालयीन कामकाजादरम्यान, 126 सुनावण्यांमध्ये 22 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
मृत सौरभच्या कुटुंबीयांनी केली होती फाशीची मागणी
मृत सौरभ राजपूत यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली होती. मृत व्यक्तीचा भाऊ राहुल याने सांगितले की, त्यांना सुरुवातीपासूनच न्यायाची अपेक्षा होती. त्याने पुढे सांगितले की, ज्या प्रकारे आरोपींनी त्याच्या भावाचा जीव घेतला, त्याच प्रकारे त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी होती.
संपूर्ण देशात गाजलं होतं प्रकरण
या घटनेत वापरण्यात आलेल्या निळ्या रंगाच्या ड्रममुळे सौरभ राजपूतची हत्या देशभर चर्चेचा विषय ठरली होती. सौरभचा मृतदेह त्याच्याच घरात एका निळ्या ड्रममध्ये सापडला होता. त्याची हत्या करून मृतदेह त्या निळ्या ड्रममध्ये पुरल्याचाा आरोप त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल यांच्यावर आहे. पोलिसांनी मुस्कान आणि साहिल यांना अटक करून गेल्या वर्षी 19 मार्च रोजी तुरुंगात पाठवले.