नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला शनिवारी, 31 ऑक्टोबर रोजी औपचारिक सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रामकुंडावर धर्मध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक आणि प्रशासकीय पातळीवर नवी गती मिळाली आहे. कुंभमेळा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या सोहळ्याला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
गोदावरीच्या तीरावरील रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-महंत आणि भाविक उपस्थित होते.
नाशिकमधील सोहळ्यासोबतच त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. अशा प्रकारे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये सिंहस्थाच्या शुभारंभाचे धार्मिक विधी पार पडले.
संध्याकाळी गोदावरीच्या तीरावर सुमारे 6500 आदिवासी बांधव आणि भगिनींनी सामूहिक गोदा आरती सादर केली. या उपक्रमातून आदिवासी समाजाचा सांस्कृतिक सहभाग आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. या सोहळ्याच्या निमित्ताने सायंकाळी पवित्र गोदावरीच्या तीरावर झालेली भव्य गोदा आरती हा आणखी एक अविस्मरणीय क्षण ठरला. सुमारे सहा हजार पाचशे आदिवासी बांधव-भगिनींनी एकत्र येऊन सादर केलेली गोदा आरती ही आपल्या सांस्कृतिक एकात्मतेची आणि सर्वसमावेशकतेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. या आरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थासाठी रस्ते, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा, निवास आणि वाहतूक व्यवस्थेवर भर दिला जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने भाविकांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा देण्याचे नियोजन आहे. 2015 च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा उपयोग यंदाच्या नियोजनासाठी केला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळा संपल्यानंतरही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला उपयोगी पडतील अशा कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणावरही भर दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.