मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असो डब्यात असा एक कोणी ना कोणी असतो जो मोठ्या आवाजात आपल्या मोबाईल गाणी ऐकत असतो किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स पाहत असतो. अनेकदा अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं साध भानंही नाही का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बरं अशा व्यक्तींना आवाज कमी करण्यास सांगितल्यास त्यावरुनही वाद होतो. त्यामुळे अनेकजण त्रास होत असूनही आवाज कमी करा असं सांगण्याच्या फंद्यात पडत नाहीत. मात्र अशा व्यक्तींविरुद्ध रेल्वेनेच कारवाई केली पाहिजे असं अनेकदा वाटतं. अनेकांच्या मनातील ही सुप्त इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण रेल्वेनेच आता या मोबाईलवरील भोंग्यांवर लगाम आणण्याचा निर्णय घेतला असून थेट आर्थिक दंड आकारण्याची तयारी केली आहे.
6 वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार दंड
खरं तर रेल्वे प्रवासादरम्यान इतर प्रवासी मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलत असतील किंवा स्पीकर मोडवर वापरत असतील, तर त्याचा त्रास नक्कीच होतो. पण आता दक्षिण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. दक्षिण रेल्वेने यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रवासादरम्यान जर कोणी मोबाईल फोन स्पीकर मोडवर वापरताना किंवा मोठ्या आवाजात बोलताना आढळले, तर त्यांना 1 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे त्यानंतरही असे वर्तन सुरु राहिले तर संबंधित व्यक्तीला मोठा दंड होऊ शकतो. अनेकदा या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला कमाल शिक्षेची तरतूद ही सहा महिने तुरुंगवास आणि 5 हजार रुपयांपर्यंत दंडाची आहे.
एका घटनेनंतर घेतला रेल्वेने निर्णय
रेल्वेतील तिकीट तपासनीस आता अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारू शकतील, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. खरं तर दक्षिण रेल्वेला हा शहाणपणा एका विचित्र प्रसंगानंतर सुचला आहे. कर्नाटकमधील गायिका शिवश्री स्कंदप्रसाद यांना अशाच एका व्यक्तीचा त्रास होत असल्याने चक्क रेल्वे सुरक्षा दलाची मदत घ्यावी लागली. सोबत प्रवास करणारा एक सहप्रवासी काहीही केलं तरी आपल्या मोबाईलचा आवाज कमी करण्यास तयार नव्हता. अखेर त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेण्याशिवाय इतर पर्याय उरला नाही. या नियमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे कर्मचारी सार्वजनिक घोषणा करतील आणि तिकीट तपासनीस आता दोषी प्रवाशांना जागेवरच दंड आकारू शकतील.
या मागचा हेतू काय?
रेल्वे प्रवासातदरम्यान वेगवेगळ्या कारणांसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर वाढत असताना, सर्वांचा प्रवास अधिक शांत आणि सुखद व्हावा, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचं दक्षिण रेल्वेने स्पष्ट केलं आहे.