RBI On Gold : ऑक्टोबर 2026 पासून भारतात सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील सहा महिन्यांत, आरबीआयने परदेशातून सुमारे 60 टन सोनं भारतात परत आणले आहे. आरबीआयच्या सुवर्णसाठा 84 टक्क्यांवर पोहचला आहे. यापूर्वी हा वाटा 77 टक्के पेक्षा किंचित जास्त होता.
भारत आता आपल्या सुवर्णसाठ्याचा एक मोठा भाग देशांतर्गत साठवत आहे. जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात आरबीआयने घेतलेला हा निर्णय देशाला आर्थिक स्थिरता मिळवूण देण्यास निर्णायक भूमिका बजावणारा आहे.
आरबीआयने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार मार्च ते सप्टेंबर 2026 दरम्यान 60.08 टन सोने भारतात परत आणले आहे. परिणामी, आरबीआयकडे आता एकूण 880.52 टन सोने आहे. यापैकी, सप्टेंबर 2026 च्या अखेरीस 740.13 टन सोने भारतात राहिले. उर्वरित सोने परदेशात साठवले आहे. तथापि, यामुळे भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यात वाढ झालेली नाही. केवळ परदेशात असलेले सोनेच भारतात परत आणले गेले आहे.
आरबीआयने परदेशात साठवलेले सोनं भारतात परत आणले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये तणाव, युद्धे आणि आर्थिक अनिश्चिततेचा सावट आहे. जागतिक परिस्थिताचा आढावा घेत RBI ने सुवर्णसाठा देशातच सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जगात आर्थिक अस्थिरता अथवा तणाव स्थिती निर्माण झाल्यास परदेशात साठवलेले सोने धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भारताला आपल्या सोन्याचा मोठा हिस्सा देशांतर्गत ठेवायचा आहे, जेणेकरून गरज पडल्यास त्यावर सहज नियंत्रण ठेवता येईल.
भारतात सोन्याच्या किंमती झपाट्याने घसरत आहेत. जानेवारीमध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.80 लाख रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता. सोन्याचे दर प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. सोन्याचा दर 1.20 लाख रुपयांवर आला आहे. दर पाहता सोन्याच्या दरात 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2027 पर्यंत सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सोन्याच्या प्रमाणात वाढ होऊनही, परकीय चलन साठ्याच्या एकूण मूल्यात त्याचा वाटा कमी झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्याच्या संदर्भात, परकीय चलन साठ्यामधील सोन्याचा वाटा मार्च 2026 अखेरीस असलेल्या 16.70 टक्केच्या तुलनेत सप्टेंबर 2026 अखेरीस 14.38 टक्के पर्यंत घसरला आहे.