नातेवाईकाला सोडायला आले आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले. त्यानंतर 12 नागरिकांसोबत जे झालं ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. कानपूर सेंट्रल स्थानकात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या नातेवाईकाला सोडण्यासाठी 12 जण स्थानकात आले. इतकंच नव्हे तर ते ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी ट्रेनमध्ये शिरले. मात्र ट्रेनचे गेट बंद झाल्यानंतर ते आतमध्येच अडकून पडले आहे. गेट उघडण्यासाठी त्यांनी एकच गोंधळ घातला. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर रविवारी सकाळी ट्रेन इटावा स्थानकात थांबवण्यात आली व सगळ्यांना उतरवण्यात आले. इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून दंडदेखील वसुल करण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांत 22415 वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस रविवारी सकाळी कानपूर स्थानकात पोहोचली होती. कानपूरमधून विविध भागातून आलेल्या 12 जण त्यांच्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी ट्रेनच्या आत शिरले. त्याचवेळी गेट बंद झाला. एकदा का वंदे भारत ट्रेनचे दरवाजे बंद झाले तर थेट पुढच्या स्थानकातच उघडतात.
वाराणसीनंतर प्रयागराज आणि कानपूरमध्ये वंदे भारतला थांबा आहे. त्यानंतर थेट दिल्लीला ट्रेन थांबते. मात्र आतमध्ये शिरलेल्या लोकांनी एकच गोंधळ घातला. यात महिला आणि मुलांसोबत आलेल्या लोकांनी ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतर काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी टूंडला कंट्रोलला सूचना दिली.
कंट्रोल रूमला सूचना मिळाल्यानंतर सकाळी 10.49 वाजता इटावा जंक्शनवर ट्रेन थांबवण्यात आली. स्टेशन अधीक्षक पीएम मीना, आरपीएफ दिनेश कुमार आणि जीआरपी इन्स्पेक्टर यदुवीर सिंह टीमसोबत पोहोचले होते. सर्व 12 जणांना ट्रेनमधून उतरून आरपीएफ पोस्टयेथे नेण्यात आले.
आरपीएफ निरीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. गोंधळ आणि प्लॅटफॉर्म तिकिटांच्या अभावामुळे, वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 36,000 रुपयांचा दंड वसूल केला. प्रति व्यक्ती 3,000 रुपयांचे तिकीट दिले. तसंच, ही चूक पुन्हा न करण्याची ताकीद देऊन सर्वांना सोडून देण्यात आले.