दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर आंदोलनाच्या यादीतून वगळल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने राजधानीमधील कनॉट प्लेस येथे आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 'लहरा दो तिरंगा' मोर्चा जाहीर केला आहे. 16 ऑक्टोबरला हा मोर्चा होणार असून, त्याआधीच आपल्याला पोलीस ताब्यात घेतील अशी भीती अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सीजीपेचं हे नियोजित आंदोलन थांबवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे छोट्या व्यवसायिक, दुकानदारांचं नुकसान होऊ शकतं असा दावा करत ही याचिका करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तात्काळ आदेश देण्यास नकार दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, आमची अपेक्षा आहे की लोक समजूतदारपणे वागतील. व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. आम्ही 26 किंवा 17 ऑक्टोबरला सुनावणी करु. तसंच गरज पडल्यास आम्ही आदेशही देऊ.
अभिजीत दिपके यांनी आज संध्याकाळी 5 वाजता कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आवाज उठवणारे रांका आणि दास यांनी 13 ऑक्टोबर रोजी गेटवरून उडी मारून जंतरमंतर परिसरात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी तिरंगा ध्वज हातात धरला होता आणि घोषणाही दिल्या होत्या. पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेतले आणि दुसऱ्या दिवशी अधिकृतपणे अटक केली. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यानंतर सीजेपीने 'तिरंगा मार्च' काढण्याची घोषणा केली आहे. याआधी, 15 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये होणारे आंदोलन रोखण्यासाठी आदेश देण्यास नकार दिला होता. सुनावणीदरम्यान, पोलिसांनी आंदोलनासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जातील असं सांगितलं होतं.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कनॉट प्लेसच्या मध्यवर्ती भागात हे आंदोलन केले जाणार असून आंदोलनासाठी ही योग्य जागा नाही असा युक्तिवाद केला होता. या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी विनंती केली की, हे आंदोलन थांबवले जावे.
सीजेपीच्या आंदोलाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात 6 हजारांहून अधिक कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 220 तुकड्या तैनात केल्या आहेत. येथे सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रवेशाचं आणि बाहेर पडण्याचं ठिकाण सुरक्षित असले यावर जास्त भर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांची ये-जा कोणत्या अडथळ्याविना सुरू राहील. या परिसरावर सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जात आहे.
सीजेपी निदर्शनांच्या दरम्यान, नवी दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) प्रशासकीय कारणांमुळे शुक्रवारी आणि शनिवारी 'सेंट्रल पार्क' सर्वसामान्यांसाठी बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.