लैंगिक गुन्हे करण्याकडे प्रवृत्त असलेल्या पुरुषांच्या मनात भीती निर्माण केली पाहिजे, अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली पोलिसांना करून दिली. न्यायालयाने पोलिसांना अशा महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जिथे गुंड प्रवृत्तीचे लोक विद्यार्थिनींशी छेडछाड करतात. त्यानंतर, दिल्लीभरातील अशा हजारो अनधिकृत आस्थापनांवर लक्ष केंद्रित केले जावे, जिथे समाजकंटक एकत्र जमतात आणि मद्यपान करतात, असेही न्यायालयाने नमूद केले.
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात अलीकडच्या काळात घडलेल्या बलात्काराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. यामध्ये स्लीपर बसमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचाही समावेश आहे. यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही स्पष्ट सूचना दिल्या. गुन्हा करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. जोपर्यंत समाजकंटकांच्या मनात आपण लैंगिक गुन्हा केल्यास निश्चितपणे मृत्यूला सामोरे जावे लागेल अशी भीती निर्माण होणार नाही तोपर्यंत अनेस गुन्हे घडत राहतील असं न्यायालयाने सांगितलं.
"जोपर्यंत तुम्ही समाजकंटकांच्या मनात आता काही केले तर जीव जाईल अशी भीती निर्माण करत नाही, तोपर्यंत तुम्ही अशा गुन्ह्यांना रोखू शकणार नाही," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. दक्षिण दिल्लीतील एका मुलींच्या महाविद्यालयापासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेल्या उद्यानातील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा संदर्भ देत, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारणा केली की, "यासंदर्भात जी प्रतिबंधात्मक पावले उचलली जायला हवी होती, ती का उचलली गेली नाहीत?".
"या दुर्दैवी घटनेच्या बाबतीतही, लोकांनी तुम्हाला या गुन्हेगारांबद्दल आधीच सावध केले होते, असे म्हटले जात आहे," असे न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नमूद केले. "तुम्ही अशा गुन्ह्यांना कसे रोखता? असे गुन्हे थांबले पाहिजेत याची आम्हाला खात्री करायची आहे. आपण सर्वांनी मिळून काम केल्यास नक्कीच फरक पडू शकतो," असे न्यायमूर्ती पारडीवाला म्हणाले. तसेच, राष्ट्रीय राजधानीत या समस्येचा सामना करण्यासाठी 'वॉर रूम' स्थापन करण्याबाबत त्यांनी पोलिसांकडून माहिती मागवली.
एका शिफारशीमध्ये लैंगिक गुन्हेगारांच्या राष्ट्रीय डेटाबेसमधील संशयितांवर लक्ष ठेवण्याचे सुचवण्यात आले होते. "आम्ही तुम्हाला आग्रहाने सांगतो की, सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करा. पुढील चार आठवड्यांत अशा आणखी घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्या. महाविद्यालयांवर लक्ष द्या. तिथे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात जे विद्यार्थिनींची छेडछाड करतात. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की दिल्लीभर हजारो अनधिकृत खानावळी आहेत आणि तिथे समाजकंटक जमा होतात. अशा ठिकाणी मद्यपानालाही मुभा असते," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
न्यायमूर्ती पारडीवाला यांनी 2012 मधील निर्भया प्रकरणाचा उल्लेख केला आणि पोलिसांना आठवण करून दिली की, त्या प्रकरणातील दोषींनीही तो क्रूर गुन्हा करण्यापूर्वी मद्यपान केले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेण्यास संकोच करू नये. लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला तरीही, लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले. "तरुण मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला हे करावेच लागेल," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.