आपल्याच लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडली मुलगी; थोड्याच वेळात आली धक्कादायक बातमी, संपूर्ण कुटुंब हादरलं
सिंधूश्री आपल्या चुलत बहिणीसह तिच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडली होती.
आज मी माझ्या मुलीचा हळदी समारंभ करणार होते. पण त्याऐवजी मी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. रविवारी तिचं लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन सोहळा पार पडणार होता. आमच्या संपूर्ण घरात लग्नाची तयारी सुरु होती. पण आता सर्व काही संपले आहे अशा भावना सिंधुश्रीच्या आईने व्यक्त केल्या आहेत. रस्त्यावर लॉरीने दिलेल्या धडकेत 29 वर्षीय सिंधुश्रीचा मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत असतानाच रस्ते अपघाता तिला दुर्देवीपणे जीव गमवावा लागला.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी सिंधुश्री आपली 19 वर्षीय चुलत बहिण विद्यासह लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी लॉरीने स्कुटीला दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. बंगळुरुच्या दिपांजलीनगर भागात बुधवारी संध्याकाळी हा अपघात झाला. दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सिंधुश्री विवाहबंधनात अडकणार होती. रविवारी रिसेप्शन सोहळा होणार होता. मात्र त्याआधीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
शवगृहाबाहेर अश्रू ढाळत नंजुंदप्पा यांनी सांगितले की, त्यांची मुलगी लग्नाचे शेवटचे आमंत्रण देण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी बाहेर पडली होती. "माझी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती, मी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. लग्नाचे एक शेवटचे आमंत्रण द्यायचे आहे, असे सांगून ती बाहेर गेली होती. परत येत असतानाच ही दुर्घटना घडली. आज तिचा 'हळदी' समारंभ होता, पण आता आम्हाला तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागत आहे. रविवारी तिचा रिसेप्शन सोहळा ठरला होता. लग्नासाठी मी सर्व काही खरेदी केले होते, संपूर्ण घर लग्नाच्या साहित्याने भरलेले आहे. आता सर्व काही संपले आहे," असे म्हणत ते ढसाढसा रडू लागले.त्यांनी सांगितले की, अपघातात मृत्यूमुखी पडलेली विद्या ही त्यांच्या बहिणीची मुलगी होती. त्यांच्या बहिणीला दोन अपत्ये होती, तर त्यांना स्वतःला एकच मुलगी होती.
सिंधुश्रीच्या लग्नाच्या आनंदात मग्न असलेल्या या कुटुंबावर रातोरात दुःखाचा सावट पसरले. तिच्या लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या दुर्घटनेमुळे सर्वत्र धक्का आणि दुःख व्यक्त केले जात आहे.
नातेवाईकांनी या भागात मालवाहू वाहनांच्या येण्या-जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अपघातासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जर या रस्त्यावर अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश दिला नसता, तर ही दुर्घटना टाळता आली असती.
"याला जबाबदार कोण? ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी होती. आता ते काय करतील? जर पोलिसांनी या भागात मालवाहू वाहनांना येण्या-जाण्याची परवानगी दिली नसती, तर कदाचित हा अपघात घडलाच नसता. गेलेल्या दोन जीवांची जबाबदारी कोण घेणार?" असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिंधूश्रीने शेजाऱ्याकडून दुचाकी घेतली होती आणि ती एका नातेवाईकाला लग्नाची पत्रिका देण्यासाठी बाहेर पडली होती. प्राथमिक तपासानुसार, प्रवास करत असताना एका लॉरीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या आणि चाकाखाली आल्या. अपघातानंतर पळून गेलेल्या लॉरी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.