अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. अभिनेत्री उर्मिला सनावर हिची नार्को आणि पॉलीग्राफ टेस्ट करण्याचे आदेश देहराडून येथील सीबीआय न्यायालयाने दिले आहेत. ही चाचणी गुजरातमधील गांधीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार आहे.
शुक्रवारी उर्मिला सनावर सीबीआय न्यायालयात हजर झाली होती. सुमारे दोन तास सुनावणी झाल्यानंतर तिने नार्को आणि पॉलीग्राफ टेस्टसाठी लेखी संमती दिली. आपण या चाचणीसाठी पूर्णपणे तयार असल्याचेही तिने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
उर्मिलाची वकील शिवानी तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीसाठी संमतीपत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून उर्मिलाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. दोन्ही चाचण्या गुजरातमधील गांधीनगर येथे होणार आहेत. मात्र, चाचणीची अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत वैद्यकीय तपासणी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात भाजपमधून निष्कासित माजी आमदार सुरेश राठौर यांचीही नार्को आणि पॉलीग्राफ टेस्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उर्मिला सनावरविरोधात मानहानी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला सहारनपूर येथील निवासस्थानातून अटक केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात हरिद्वार येथील न्यायालयाने या प्रकरणात तिला जामीन मंजूर केला.
आता अंकिता भंडारी हत्याकांडातील नार्को आणि पॉलीग्राफ टेस्टमधून काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
18 सप्टेंबर 2022 साली उत्तराखंडच्या ऋषिकेशच्या वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या 19 वर्षीय अकिंताची हत्या करण्यात आली होती. रिसॉर्टचा मालक पुलकित आर्यने 2 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अंकिताची हत्या घडवून आणली होती. त्यानंतर हे प्रकर्ण शांत झाले होते. मात्र मागील वर्षी उर्मिला सनावर हिची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
डिसेंबर 2025 मध्ये उर्मिला सनावर यांनी काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या होत्या, ज्यामध्ये अंकिता भंडारी हत्याकांडाशी संबंधित एका मोठ्या राजकीय नेत्याचा/व्हीआयपीचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. याच दाव्यांची आणि ऑडिओ क्लिप्सच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी सीबीआय तपास करत आहे.
उर्मिला सनावर या उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एक टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहेत. उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड आणि भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यासोबतच्या वादांमुळे त्या देशभरात चर्चेत आल्या आहेत.
उर्मिला सनावर यांनी उत्तराखंडमधील ज्वालापूरचे माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांच्याशी आपले लग्न झाल्याचा दावा केला होता. जून 2025 मध्ये दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन याची कबुली दिली होती. समान नागरी कायद्याचे (UCC) उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपने राठोड यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाले आणि एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले गेले.