पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये आपल्या जुन्या विधानावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. 'मी कलाकार आहे, राजकारणी नाही' या त्याच्या विधानावरून सुरू झालेला वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात दिलजीतने कोणाचेही नाव न घेता टीकाकारांना सुनावले. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर दिलजीतला उद्देशून समेटाची भूमिका मांडली. त्यामुळे काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वादाला नवे वळण मिळाले आहे. अभिजित दीपके आणि दिलजीत दोसांझ यांच्यातील वाद नेमका काय? सविस्तर जाणून घेऊया.
जून महिन्यात दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटीच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाबाबत दिलजीतला विचारले असता त्याने 'मी कलाकार आहे, राजकारणी नाही' अशी भूमिका मांडली होती. आंदोलनापासून दूर राहण्याच्या त्याच्या या उत्तरावर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. सीजेपीचे अभिजीत दिपके यांनीही दिलजीतवर टीका केली होती. सामाजिक विषयांवर भूमिका घेणाऱ्या कलाकाराने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतही बोलावे, अशा आशयाचे विधान दीपके यांनी केले होते.
30 ऑक्टोबरला दिलजीतच्या ऑरा इंडिया टुर 2026 ची सुरुवात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधून झाली. हजारो चाहत्यांसमोर गाणी सादर करताना त्याने जुन्या वादाचा उल्लेख केला. 'मी कलाकार आहे, म्हणून शांत आहे; पण मला शांत राहू द्या. मी तुम्हा सर्वांना पाठिंबा देतो. पंजाब्यांना लढायला कसे शिकवायचे ते सांगू नका,' अशा आशयाचे वक्तव्य त्याने केले. त्याने कोणाचेही नाव घेतले नसले तरी हे वक्तव्य सीजेपी आणि त्याच्या टीकाकारांच्या संदर्भात असल्याचे म्हटले जाते.
दिलजीतने आपल्या 'सतलुज' चित्रपटाची खिल्ली उडवल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनाशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष करावा लागल्याचे दिलजीतने सांगितले. एखाद्याला आपल्याबद्दल नाराजी असली तरी आपण प्रेमाची भावना कायम ठेवतो, असेही त्याने म्हटले.
दिलजीतच्या वक्तव्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक खुला संदेश लिहिला. जूनमधील विधानामुळे आपल्याला वाईट वाटले होते; मात्र दिलजीतबद्दलचा आदर कमी झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दिलजीतच्या संगीताचा आणि त्याच्या कामाचा आपण आजही चाहता असल्याचे सांगत, 'मला लहान भाऊ समजून हा विषय सोडून द्या,' अशा शब्दांत त्यांनी समेटाची विनंती केली.
एका बाजूला कलाकारांची सामाजिक जबाबदारी किती असावी, तर दुसरीकडे प्रत्येक कलाकाराला राजकीय विषयांवर मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे का, अशी चर्चा या घटनेमुळे पुन्हा सुरू झाली आहे. दिलजीतने आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले असून दिपके यांनीही मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. आता दोघांमधील हा वाद प्रत्यक्षात संपतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.