Mega Block : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर आणि उपनगरातील व्यक्ती हे दररोज याच लोकल ट्रेनने प्रवास करतात. रेल्वेकडून अधिकतर रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक घेतला जातो. या दरम्यान एका विशिष्ट कालावधीसाठी लोकल ट्रेन या बंद असतात. रविवारी बहुतेक नोकरदार वर्गाला सुट्टी असल्याने इतर दिवशी होतो तसा खोळंबा प्रवाशांचा होत नाही. मात्र एखादा सण किंवा विशेष गोष्ट ही रविवारी आली तर लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेगा ब्लॉकमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. पुढील आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी सणानिमित्ताने अनेकजण दादर येथील भागात शॉपिंग करण्यासाठी येत असतात. दिवाळीपूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने नागरिक सुट्टीच्या दिवशी शॉपिंग करण्याकरता मुंबईच्या मार्केटमध्ये येण्याचा प्लॅन करत असतील, मात्र मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेणार असल्याने दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार आहे.
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक :
मध्य रेल्वे :
सीएसटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी १०: ५५ ते दुपारी ३: ५५ दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
रविवारी मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी पासून ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार स्टेशन येथून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
ट्रान्सहार्बर मार्ग :
ठाणे - वाशी / नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. हा ब्लॉग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत असेल.
ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी, नेरूळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या, तसेच वाशी, नेरूळ आणि पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नोंद घ्यावी.
पश्चिम रेल्वे :
बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. शनिवार - रविवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉग असणार आहे.
ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल विरार वसई रोड ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक नसेल.