पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात एका 33 वर्षीय महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिग्नेचर पार्क या निवासी संकुलात ही घटना घडली. प्राथमिक तपासात महिला मुलासह इमारतीच्या 18व्या मजल्यावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
एकता भांगड (33) आणि त्यांचा मुलगा माधव (6) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या आतील भागातून आवाज आल्यानंतर रहिवाशांनी पाहणी केली. त्यावेळी महिला आणि मुलगा गंभीर अवस्थेत आढळले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
एकता या पती मनोज भांगड आणि मुलासह सिग्नेचर पार्कमध्ये राहत होत्या. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास होते. मनोज हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत काम करतात. घटनेच्या दिवशी सकाळी ते कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात एकता आणि त्यांचा मुलगा होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी निवासी संकुलातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्राथमिक माहितीनुसार, एकता मुलाला सोबत घेऊन लिफ्टने 18व्या मजल्यावर गेल्याचे फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर नेमके काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुरावे तपासाचा महत्त्वाचा भाग आहेत. या प्रकरणात पोलिसांना एक चिठ्ठी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामध्ये महिलेने आपल्या आजारपणाचा उल्लेख केल्याची माहिती काही माध्यमांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हवाल्याने दिली आहे.
दोघांचे मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (YCM) पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक तपासणी आणि संबंधितांची चौकशी सुरू आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती काय होती? याचा तपास घेतला जात आहे.