सोने आणि चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 4 टक्क्यांनी घसरून 1 लाख 22 हजार 435 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. चांदीचा दर जवळपास 6 टक्क्यांनी कमी होऊन 1 लाख 48 हजार 34 रुपये प्रति किलोवर पोहोचला. हे दर त्या दिवशीच्या बाजारातील आकडेवारीनुसार आहेत. दोन्ही धातूंच्या किमती 2026 मधील आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहे. विशेष म्हणजे चांदीतील घसरण सोन्याच्या तुलनेत अधिक तीव्र आहे. त्यामुळे सोनं 1 लाखांपेक्षा कमी होणार का? सोनं. चांदी घेण्याची हीच योग्य वेळ आहे का? यावर तज्ज्ञ काय म्हणतायत? सविस्तर जाणून घेऊया.
यंदा 29 जानेवारी रोजी सोन्याने 1 लाख 83 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. सध्याच्या दराशी तुलना केल्यास सोने सुमारे 60 हजार 565 रुपयांनी म्हणजेच 33 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाले आहे. चांदीने यंदा 4 लाख 4 हजार 500 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. आता तिचा भाव 1 लाख 48 हजार रुपयांच्या आसपास आल्याने उच्चांकापासून जवळपास 63 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सोन्याचा सध्याचा भाव आणि एक लाख रुपयांची पातळी यामध्ये सुमारे 22 हजार 435रुपयांचे अंतर आहे. म्हणजेच सध्याच्या भावातून आणखी सुमारे 18 टक्के घसरण झाल्यास सोने एक लाख रुपयांवर येऊ शकते. मात्र, तज्ज्ञांनी सोने निश्चितपणे या पातळीवर येईल, असा अंदाज व्यक्त केलेला नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली तर आधीच घसरलेल्या किमती आणखी खाली जाऊ शकतात, असे कोटक निओचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च प्रमुख अनिंद्य बॅनर्जी सांगतात.
या घसरणीमागे प्रामुख्याने तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने डॉलरमध्ये व्यवहार होणाऱ्या सोन्या-चांदीवर दबाव वाढला आहे. दुसरे कारण म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, अशी बाजारातील अपेक्षा. व्याजदर वाढल्यास व्याज मिळत नसलेल्या सोन्यापेक्षा व्याज देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढू शकतो. तिसरे कारण म्हणजे जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव. गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम उभी करण्यासाठी मौल्यवान धातूंसह इतर मालमत्तांचीही विक्री होत असल्याचे बाजार विश्लेषक सांगतात.
दर कमी झाल्याने दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे लक्ष पुन्हा सराफा बाजाराकडे वळले आहे. मात्र, मोठी घसरण झाल्यानंतरही बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही ग्राहक एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास प्राधान्य देतायत. मुंबईसह महाराष्ट्रातील ग्राहकांनी खरेदीपूर्वी स्थानिक सराफांकडील त्या दिवसाचा दर, सोन्याची शुद्धता, जीएसटी आणि घडणावळ तपासावी. कारण वायदे बाजारातील दर आणि दागिन्यांचा अंतिम बिलातील दर एकसारखा नसतो. केवळ दर घसरले म्हणून घाईने निर्णय घेणे टाळावे.