भारताची पहिली स्वदेशी B28 बुलेट ट्रेन अंतिम चाचण्यांच्या टप्प्यात आहे. 280 किमी चाचणी वेग, 557 प्रवासी क्षमता, वायफाय सुविधा आणि मुंबई-अहमदाबाद मार्गाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनच्या निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता भारतातच हायस्पीड ट्रेन विकसित करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे.
1/8
India Bullet Train: भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन तयार! प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार; काय आहे खास?
भारताची पहिली स्वदेशी B28 बुलेट ट्रेन अंतिम चाचण्यांच्या टप्प्यात आहे. 280 किमी चाचणी वेग, 557 प्रवासी क्षमता, वायफाय सुविधा आणि मुंबई-अहमदाबाद मार्गाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
2/8
बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू
भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. B28 अर्थात भारत 28 नावाने विकसित करण्यात येणारी ही ट्रेन बीईएमएल कंपनीच्या बंगळुरू येथील उत्पादन केंद्रात तयार होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनच्या निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता भारतातच हायस्पीड ट्रेन विकसित करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे.
3/8
स्क्वीझ टेस्ट म्हणजे काय?
B28 ट्रेनच्या डब्याची स्क्वीझ टेस्ट म्हणजेच वाहनाच्या बाह्य सांगाड्याची मजबुती तपासण्याची चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अपघात किंवा धडकेच्या वेळी बाहेरून मोठा दबाव आल्यास डब्याची रचना किती मजबूत राहते, याची तपासणी यात केली जाते. प्रवाशांचा डबा सुरक्षित राहण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे. यानंतर ट्रेनमध्ये इंजिनची यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसवण्यात येणार आहे.
4/8
एका ट्रेनमध्ये 557 प्रवासी
B28 ट्रेनमध्ये सुरुवातीला आठ डबे असतील. त्यापैकी सात डबे स्टँडर्ड क्लासचे आणि एक डबा एक्झिक्युटिव्ह क्लासचा असेल. स्टँडर्ड क्लासमध्ये 3 बाय 2 आसनव्यवस्था, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 2 बाय 2 आसनव्यवस्था असेल. एका ट्रेनमधून सुमारे 557 प्रवासी प्रवास करू शकतील. भविष्यात दोन आठ डब्यांच्या ट्रेन जोडून 16 डब्यांची ट्रेन चालवता येणार आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता 1114 पर्यंत जाऊ शकते.
5/8
वायफाय, मनोरंजन आणि आरामदायी आसनांची सुविधा
प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी ट्रेनमध्ये अनेक आधुनिक सुविधा असतील. वायफाय आधारित मनोरंजन प्रणाली, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट, मोठ्या खिडक्या, सामान ठेवण्यासाठी रॅक आणि एलईडी लाइटिंग असेल. प्रत्येक डब्यात वातानुकूलनासाठी दोन HVAC युनिट्स असतील. तसेच बायो-डायजेस्टर शौचालयांची सुविधाही दिली जाणार आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक माहिती देण्यासाठी एलसीडी स्क्रीन आणि स्वयंचलित उद्घोषणा प्रणाली असेल.
6/8
दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
या ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांचाही विचार करण्यात आला आहे. व्हीलचेअर सहज नेता येतील अशी प्रवेशद्वारे, विशेष आसने, स्वतंत्र शौचालय सुविधा आणि ब्रेल लिपीतील सूचना देण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या प्रवेशाची उंची जुळवून चढताना-उतरताना अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था असेल. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी टॉक-बॅक यंत्रणाही असेल.
7/8
महाराष्ट्रातील कोणती स्थानके?
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची लांबी 508 किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर. गुजरातमध्ये वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानके असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश आणि गुजरातमधील प्रमुख औद्योगिक शहरांना हायस्पीड रेल्वेने जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
8/8
बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?
रेल्वेच्या नियोजनानुसार सुरत ते वापी या सुमारे 100 किलोमीटरच्या टप्प्यावर मे-जून 2027 दरम्यान चाचणी धाव घेण्याचे नियोजन आहे. या टप्प्यावर व्यावसायिक सेवा ऑगस्ट 2027 मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य आहे. गुजरातमधील संपूर्ण विभाग डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून मुंबई-अहमदाबादचा संपूर्ण 508 किलोमीटरचा कॉरिडॉर डिसेंबर 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.