महाराष्ट्रात ठाणे खाडीखालून भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा तयार होत आहे.
बुलेट ट्रेनसाठी २१ किमीचा बोगदा, ७ किमी समुद्राखालील मार्ग आणि तीन हजार टनांच्या TBM ची माहिती जाणून घ्या.
1/8
भारतातील पहिलाच समुद्राखालचा रेल्वे बोगदा महाराष्ट्रात! ठाणे खाडीखालून टनल
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला जातोय. नवी मुंबईतील घणसोलीजवळील सावली ते विक्रोळी या मार्गावर बोगद्याचे खोदकाम सुरू असून, या प्रकल्पातील सुमारे 7 किलोमीटरचा भाग ठाणे खाडीखालून जाणार आहे. पूर्ण झाल्यानंतर हा भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा ठरणार आहे.
2/8
आव्हानात्मक अभियांत्रिकी काम
या कामासाठी तीन हजार टनांहून अधिक वजनाच्या टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जातोय. या बोगद्यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गातील एक अत्यंत आव्हानात्मक अभियांत्रिकी काम पूर्ण होणार आहे.
3/8
21 किलोमीटरचा बोगदा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते शिळफाटा या दरम्यान एकूण 21 किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा तयार केला जात आहे. यापैकी सुमारे 7 किलोमीटरचा मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. त्यामुळे हा भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा ठरणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील बुलेट ट्रेनच्या मार्गाला जोडण्यासाठी हा विभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
4/8
तीन हजार टनांच्या मशीनने खोदकाम
या बोगद्याच्या 16 किलोमीटरच्या भागासाठी टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरली जात आहेत. प्रत्येक मशीनचे वजन तीन हजार टनांपेक्षा अधिक असून, कटर हेडचा व्यास 13.6 मीटर आहे. 18 जुलै 2026 रोजी दुसऱ्या टीबीएमने घणसोलीजवळील सावली येथून विक्रोळीच्या दिशेने खोदकाम सुरू केले. याआधी 5 जुलै रोजी पहिल्या मशीनने विक्रोळीहून बीकेसीच्या दिशेने काम सुरू केले होते.
5/8
बोगद्याची खोली आणि बांधकाम पद्धत
हा बोगदा जमिनीपासून साधारण 25 ते 57 मीटर खोलीवर असेल. पारसिक डोंगराखालील सर्वाधिक खोल बांधकामाचा बिंदू 114 मीटरवर आहे. बोगद्याचा अंतर्गत व्यास सुमारे 13.1 मीटर असून, एकाच बोगद्यात दोन्ही दिशांच्या रेल्वे रुळांची व्यवस्था केली जाणार आहे. एकूण 21 किलोमीटरपैकी 16 किलोमीटरचे काम टीबीएमने, तर उर्वरित 5 किलोमीटरचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून केले जात आहे.
6/8
पाण्याचा दाब आणि जमिनीच्या हालचालींचे आव्हान
समुद्राखाली खोदकाम करताना पाण्याचा दाब, मातीची स्थिरता आणि पाणी झिरपण्याचा धोका ही मोठी आव्हाने असतात. त्यासाठी स्लरी-आधारित मिक्सशील्ड TBM वापरली जात आहे. खोदकाम सुरू असताना बोगद्याच्या भिंतींना काँक्रीटचे तयार भाग बसवून मजबुती दिली जाते. आसपासच्या इमारती आणि जमिनीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर्स आणि निरीक्षण यंत्रणाही वापरली जात आहेत.
7/8
महापे येथे 77 हजार काँक्रीट भागांची निर्मिती
बोगद्याच्या अस्तरीकरणासाठी लागणारे काँक्रीटचे भाग तयार करण्यासाठी महापे येथे स्वतंत्र कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे. एनएसएसआरसीएल च्या माहितीनुसार, येथे सुमारे 77 हजार काँक्रीट सेगमेंट तयार करून 7700 रिंग बनवण्यात येणार आहेत. या रिंगच्या साहाय्याने बोगद्याच्या आतील भागाला मजबुती दिली जाईल. बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.