सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवल्यास 21 वर्षांनी 47.88 लाखांचा निधी तयार होऊ शकतो.
या योजनाची पात्रता, व्याजदर, गुंतवणूक आणि पैसे काढण्याचे नियम जाणून घ्या.
1/7
मुलीच्या नावावर दरवर्षी 1 लाख रुपये भरा, मिळतील 47 लाख! काय आहे सरकारी योजना?
मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी दीर्घकालीन बचत करायची असेल, तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक पर्याय आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आली.
2/7
कोण उघडू शकतं खातं
या योजनेत पालक किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी हे खाते उघडणे आवश्यक आहे. एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येते. सामान्यतः एका कुटुंबातील दोन मुलींसाठी खाते उघडण्याची परवानगी आहे.
3/7
दरवर्षी एक लाख रुपये भरल्यास
दैनिक जागरणच्या गणनेनुसार, दरवर्षी एक लाख रुपये जमा केल्यास 21 वर्षांनंतर अंदाजे 47 लाख 88 हजार 79 रुपये मिळू शकतात. या गणनेत वार्षिक 8.2 टक्के व्याजदर गृहीत धरला आहे. वार्षिक गुंतवणूक 1 लाख रुपये, गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षे पकडल्यास एकूण जमा रक्कम 15 लाख रुपये होते. यात गृहीत व्याजदर 8.2 टक्के पकडला तर 21 वर्षांनंतर अंदाजित रक्कम 47.88 लाख रुपये गोळा होते. ज्यात अंदाजित व्याज 32.88 लाख रुपये होते. या गणनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एक लाख रुपये जमा केल्याचे गृहीत धरले आहे.
4/7
15 वर्षे पैसे भरा
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे खाते उघडल्यानंतर पहिली 15 वर्षेच पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर नवीन गुंतवणूक न करताही जमा रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहते. खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ते मॅच्युअर होते. सध्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी व्याजदर 8.2 टक्के आहे. मात्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेत असल्याने भविष्यातील परतावा बदलू शकतो.
5/7
अर्धी रक्कम काढता येते
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, यापैकी जे आधी घडेल त्या टप्प्यावर उच्च शिक्षणासाठी खात्यातील मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेल्या शिल्लक रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतात. त्यासाठी शिक्षणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी या योजनेचा उपयोग होऊ शकतो.
6/7
खाते कुठे उघडायचे?
सुकन्या समृद्धी खात्यात एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. खाते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते. मुलीचा जन्मदाखला आणि पालकांची आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात.
7/7
करसवलत मिळते का?
या योजनेतील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत करसवलतीची पात्रता आहे. मात्र, करसवलतीचा प्रत्यक्ष लाभ निवडलेल्या करप्रणालीवर अवलंबून असतो. त्यामुळे खाते उघडण्यापूर्वी नियम आणि करपरिणाम तपासणे महत्त्वाचे आहे.