इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने एका भारतीय क्रिकेटपटूसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. विशेष म्हणजे या क्रिकेटरबद्दल बोलताना पीटरसनने मोठा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल असं भाकीत व्यक्त केलं आहे. ही भविष्यावाणी त्याने तीन दिवसांपूर्वी केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय आणि कोणाबद्दल म्हणालाय जाणून घेऊयात...
धडाकेबाज विक्रमी खेळी
काही दिवसांपूर्वीच, एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत 'अ' संघाकडून खेळताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने युएई 'अ' संघाविरुद्ध अवघ्या 53 चेंडूत 204 धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीत वैभवने 28 षटकार आणि 7 चौकार लगावले होते. त्याने अवघ्या 29 चेंडूत शतक आणि 52 चेंडूत द्विशतक पूर्ण करत पुरुषांच्या लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक आणि द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पीटरसनने वैभव कसोटी क्रिकेटमध्येही ऐतिहासिक कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हटलंय?
या सामन्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पीटरसनने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:च्या अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. यामध्ये त्याने, "येथे एक फलंदाज आहे जो पुढील पाच वर्षांमध्ये एखाद्या कसोटी सामन्यात 500 धावा करेल, त्याचं नाव आहे वैभव!" होय पीटरसनने ही भविष्यवाणी भारताचा तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीसंदर्भात केली आहे.
Here’s a shout — Vaibhav will score a 500 in a Test Match within the next 5yrs!
— Kevin Pietersen(@KP24) November 26, 2026

22 वर्षांपासूनच विक्रम कायम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकाही फलंदाजाला एका डावात 500 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. कसोटीमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ही नाबाद 400 अशी आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने 2004 साली इंग्लंडविरुद्ध ही विक्रमी खेळी केली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही हा विक्रम लाराच्याच नावावर आहे. त्याने 1994 साली वॉरविकशायरसाठी खेळताना नाबाद 501 धावा केलेल्या. दुसरीकडे वैभव सध्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 11 सामने खेळला असून त्यात 17 डावांमध्ये 23.47 च्या सरासरीने 399 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 93 इतकी आहे. वैभवने अद्याप वरिष्ठ भारतीय कसोटी संघात पदार्पण केलेले नाही, मात्र त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे तो भविष्यात ब्रायन लाराचा कसोटीतील 400 धावांचा जागतिक विक्रम मोडू शकतो, असा विश्वास केविन पीटरसनने व्यक्त केला आहे.
आता वैभवला भारताच्या कसोटी संघात कधी संधी मिळते आणि तो कधी हा विक्रम मोडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.