IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार ऑलराउंडर ग्लेन फिलिप्सने वेलिंगटनच्या बेसिन रिजर्व मैदानावर शतक ठोकून वर्ल्ड क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताच्या विरोधात शतक ठोकणारा ग्लेन फिलिप्स जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी ग्लेन फिलिप्सने 18 जानेवारी 2026 रोजी भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी त्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक नोंदवले. आता वेलिंग्टन टेस्टच्या पहिल्या डावात शतक पूर्ण करून त्याने या ऐतिहासिक कामगिरीवर आपली मोहोर उमटवली आहे.
अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा खेळाडू :
एका कॅलेंडर वर्षात एकाच संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा ग्लेन फिलिप्स हा जागतिक क्रिकेटमधील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा अनोखा विक्रम केवळ भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर होता. ज्यांनी 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध टेस्ट वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारांत शतके झळकावली होती. दरम्यान ग्लेन फिलिप्स हा एकाच देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक ठोकणारा पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे.
शेन वॉटसन आणि शाई होप यांच्यानंतर, भारताच्या विरोधात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. ग्लेन फिलिप्सच्या टेस्ट कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून, या खेळीदरम्यान त्याने इतरही अनेक टप्पे गाठले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी फिलिप्सने टेस्ट क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला. त्याने आतापर्यंत 20 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 38.35 च्या सरासरीने एकूण 1074 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा डाव सावरला :
पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा न्यूझीलंड संघाने 70 धावांवर 5 विकेट गमावून संकटात सापडली होती. तेव्हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजाने ग्लेन फिलिप्सने सहाव्या विकेटसाठी 216 धावांची चांगली पार्टनरशिप केली. ज्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीची सुरुवात खराब झालेली असताना सुद्धा ते यात यशस्वी झाले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस 94 धावांवर नाबाद असलेला फिलिप्स दुसऱ्या दिवशीही आपली खेळी सुरू ठेवत 194 बॉलमध्ये शतकापर्यंत पोहोचला. त्याने 216 बॉलमध्ये 14 चौकारांच्या मदतीने 118 धावांची जिद्दी खेळी साकारली, मात्र 94 व्या ओव्हरमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने त्याला क्लीन बोल्ड केले.