सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'
आता भारताचा माजी खेळाडू आणि युट्यूबर आर अश्विनने भारताचा कर्णधार शुभमन गिलवर संताप व्यक्त केला आहे. नक्की काय म्हणाला शुभमन गिलसंदर्भात आर अश्विन सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा पहिला सामना शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने खेळला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने चांगली कामगिरी केली पण निकाल हा सामन्याचा अनिर्णयित राहिला. पहिल्याच डावामध्ये भारताच्या संघाने 700 हून अधिक धावा केल्या यावेळी भारताचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवेल असे वाटत होते पण दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी संघाची खेळी सांभाळली आणि सामना ड्रॅा केला. या सामन्यात 15 ओव्हर शिल्लक असताना दोन्ही संघांनी हातमिळवणी केली आणि त्यानंतर आता अनेक क्रिकेट तज्ञांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता भारताचा माजी खेळाडू आणि युट्यूबर आर अश्विनने भारताचा कर्णधार शुभमन गिलवर संताप व्यक्त केला आहे.
युट्यूबवर आर अश्विन क्रिकेटबद्दल त्याचे मत व्यक्त करत असतो. यावेळी तो म्हणाला भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि विजय मिळवायला हवा होता, असे अश्विनचे मत आहे. भारताचा माजी फिरकीपटू म्हणाला, "आम्ही या कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवले, पण आम्ही त्यांना हरवू शकलो नाही. कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवल्याबद्दल कोणीही आम्हाला गुण देणार नाही. गुण विजयानेच मिळतात. लोक म्हणतील की तुम्ही चांगला कसोटी सामना खेळलात. पण, 20 बळी न घेतल्याबद्दल आणि चांगला क्रिकेट न खेळल्याबद्दल तुम्हाला गुण मिळत नाहीत. विशेषतः जेव्हा न्यूझीलंड डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आपल्यापेक्षा वर आहे. त्यांना अडचणीत आणूनही, माघार घेतल्याबद्दल आपण स्वतःवर रागावले पाहिजे हेच मला वाटते."
हे ही वाचा
4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4... बाबर आझमने ILT20 मध्ये केला कहर! ठोकली हाफ सेंच्यूरी
केवळ आर अश्विनच नाही, तर भारताचे माजी कर्णधार क्रिस श्रीकांत यांनीही दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच हार मानण्याच्या निर्णयावर तीव्र टीका केली. एका पत्रकार परिषदेत शुभमन गिलने सांगितले की, त्याचे गोलंदाज थकले होते, त्यामुळेच त्यांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. यावर श्रीकांत म्हणाले, "त्यांनी एक तास आधीच हार का मानली? तुम्ही एका तासात पाच विकेट्स घेऊ शकत नाही? मी तर आणखी एक तास खेळलो असतो. तुमचे गोलंदाज नक्कीच थकले होते, पण तुम्ही विजयाच्या अगदी जवळ होता. जर तुम्ही आणखी एक विकेट घेतली असती, तर न्यूझीलंडकडे फलंदाजीसाठी फक्त तळाचे फलंदाज उरले असते. म्हणूनच त्यांनी हार मानून सामना अनिर्णित ठेवण्याचा घेतलेला निर्णय मला समजत नाही."
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना हा 1 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. भारताकडे 350 हून अधिक धावांची आघाडी होती आणि न्यूझीलंडला सर्वबाद करण्यासाठी पुरेसा वेळही होता, परंतु सपाट खेळपट्टी, नरम पडणारा चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताला केवळ 5 बळी मिळवता आले, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला.