वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला असून मालिकाही खिशात घातली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने अवघ्या 13.2 षटकांत हे लक्ष्य गाठले. भारतासाठी अभिषेक शर्माने 38 चेंडूंत 113 धावांची तुफानी खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूंत 45 धावा करत त्याच्यासह मोलाची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. या विजयासोबतच भारताने मालिकाही जिंकली असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आता भारताकडे 3-0अशी आघाडी आहे.
199 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताने आपल्या सलामीच्या जोडीत बदल केला. 15 वर्षीय आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात केली. या जोडीने पहिल्या षटकापासूनच न्यूझीलंडला बॅकफूटवर टाकले होते. दोघांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा कुटल्या, जो एक रेकॉर्ड आहे.
पॉवरप्ले दरम्यान, अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. वैभवने त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी मिळून किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अभिषेकने अवघ्या 14 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावत 118 धावा केल्या. पुरुषांच्या टी-20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या ठरली.
India bring the fireworks with the bat to take an unassailable 3-0 lead in the T20I series over New Zealand 💥 📝: https://t.co/a3hE3wSbWt https://t.co/PA98Sh6FJt
— ICC (@ICC) October 27, 2026
अभिषेक आणि वैभव यांनी 7.1 षटकांत 133 धावांची सलामी दिली, ज्यामुळे भारताचा विजय जवळजवळ निश्चित झाला. वैभव 19 चेंडूंत 45 धावा करून बाद झाल. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर काही वेळातच अभिषेकने 35 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले.
अभिषेक 38 चेंडूंत 113 धावा करून बाद झाला तेव्हा त्याने 9 चौकार आणि 11 षटकार लगावले होते. अभिषेक बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 178 होती. यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यर 10 चेंडूंत 5 धावा करून बाद झाला, तर संजू सॅमसनने 13 चेंडूंत 18 धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. तिलक वर्मा 1 चेंडूत 1 धाव काढून नाबाद राहिला, तर नमन धीर 1 चेंडूत 4 धावा काढून नाबाद राहिला.