रणजी ट्रॉफीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, एका रात्रीत बदलला संपूर्ण संघ; नेमकं काय घडलं?
Ranji Trophy Meghalaya Team Suspended : रणजी ट्रॉफीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा घडला त्यानंतर नागालॅंड विरुद्ध रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप सामन्याच्या एक दिवस आधी मेघालयचा संपूर्ण क्रिकेट संघ निलंबित करण्यात आला.
Ranji Trophy Meghalaya Team Suspended : रणजी ट्रॉफी 2026 स्पर्धेत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अरुणाचल प्रदेशानंतर आता मेघालाय क्रिकेट संघ सुद्धा त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे अडचणीत सापडला. नागालॅंड विरुद्ध रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप सामन्याच्या ठीक एक दिवस आधी मेघालयचा संपूर्ण क्रिकेट संघ निलंबित करण्यात आला आणि त्यांच्या जागी नवीन संघ मैदानात उतरवण्यात आला.
नेमकं काय घडलं?
'द इंडियन एक्सप्रेस'च्या माहितीनुसार रणजी ट्रॉफीच्या पहिल्या तीन सामन्यांत खेळणारा संघ मेघालय क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स काउन्सिल द्वारे निवडण्यात आला होता. या अपेक्स काउन्सिल आणि असोसिएशनचे अध्यक्ष जेम्स संगमा यांच्यात वाद सुरू होता. हा वाद असोसिएशनचे सचिव रेनॉल्ड खारकामनी यांच्या निलंबनाशी संबंधित होता. त्यांच्यावर लैंगिक छळाच्या तक्रारी दडपल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
नागालँडविरुद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने जेम्स संगमा यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने सचिव खारकामणी यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब केले आणि त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेले ठराव अवैध ठरवले. त्यानंतर, संगमा गटाने एक नवीन संघ निवडला. दरम्यान अपॅक्स काउन्सिलद्वारे निवडलेल्या संघाने आपला सराव पूर्ण केला होता.
सामन्यापूर्वी खेळाडूंनी मॅच रेफरी अरिंदम सरकार यांच्याशीही चर्चा केली होती. पंचानी त्यांना खात्री दिली होती की, त्यांच्या संघाला बीसीसीआयची मंजुरी मिळाल्यावर ते सामन्यात खेळू शकतील. मात्र त्याच संध्याकाळी खेळाडूंना एक फोन आला, ज्याद्वारे त्यांना कळवण्यात आले की ते मैदानात उतरू शकणार नाहीत, कारण उच्च न्यायालयाने त्यांच्या संघाला बेकायदेशीर घोषित केले होते.
धमकी आणि पोलीस केस :
मीडिया रिपोर्ट्सनुसार मेघालयच्या खेळाडूंनी सांगितले की या संपूर्ण वादादरम्यान टीम मॅनेजरला धमकावण्यात आले होते, ज्यानंतर त्यांनी संघ सोडला. संघाच्या कर्णधाराने खेळाडूंना मिळणाऱ्या धमक्यांबाबत मॅच रेफरीकडे तक्रार केली. त्यानंतर रेफरीला आपले हॉटेल बदलावे लागले. रात्री 11 च्या सुमारास, खेळाडूंना कळवण्यात आले की बीसीसीआयच्या (BCCI) मंजुरीने एक नवीन संघ नोंदणीकृत करण्यात आला आहे.
असे असूनही दुसऱ्या दिवशी सकाळी जुन्या संघातील खेळाडू मैदानावर पोहोचले. तेव्हा त्यांना ड्रेसिंग रूमला कुलूप असल्याचे आढळले. परिणामी, पोलिसांना पाचारण करावे लागले. नंतर, जेम्स संगमा यांनी खेळाडूंची माफी मागितली त्यानंतर ड्रेसिंग रूम उघडण्यात आली.
मेघालयच्या अंडर 23 संघातही बदल करण्यात आले आहेत; या संघाला सिक्कीममधून परत बोलावून त्याच्या जागी दुसरा संघ पाठवण्यात आला आहे. 'प्लेट ग्रुप'मध्ये मेघालयचा वरिष्ठ संघ सध्या 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत एक सामना जिंकला आहे. तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान अपेक्स काउन्सिल उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करत आहे.