टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तो भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. विशेष म्हणजे, या चर्चेत आजमगड आणि कन्नौज या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांची नावे पुढे आली आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
दिवाळीच्या काळात सूर्यकुमार यादवने आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही कुटुंबासह भेट घेतली. या भेटींचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर सूर्यकुमारच्या राजकीय प्रवेशाबाबत तर्कवितर्क सुरू झाले. या भेटींचा राजकीय अर्थ लावत काही सोशल मीडिया पोस्टमध्ये भाजप त्याला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरवू शकते, असा दावा करण्यात आला.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात आजमगड आणि कन्नौज हे समाजवादी पक्षाचे प्रभावक्षेत्र मानले जाते. विशेषतः यादव समाजाचे या भागातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे भाजप सूर्यकुमार यादवच्या लोकप्रियतेचा उपयोग यादव मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करू शकते, असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.
सूर्यकुमार यादवचा जन्म मुंबईत झाला असून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्याच्या कुटुंबाचे मूळ उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील आहे. गाझीपूरमधील हथौडा हे त्यांचे मूळ गाव असल्याचे सांगितले जाते. याच उत्तर प्रदेश कनेक्शनमुळे त्याच्या संभाव्य राजकीय प्रवेशाच्या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातही सूर्यकुमारचा समावेश होता.
भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीत लोकगायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीपूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. या उदाहरणाचा संदर्भ देत काही जण सूर्यकुमार यादवच्या भेटींकडेही राजकीय शक्यता म्हणून पाहत आहेत. असे असले तरी याचा अर्थ सूर्यकुमारलाही उमेदवारी मिळेलच असे नाही. त्यामुळे 2027 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत सूर्यकुमार यादव उतरणार का?, याचे उत्तर त्याने अधिकृत घोषणा केल्यावरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.