पार्थिव पटेलने BCCI चीफ सिलेक्टर पदाच्या शर्यतीतून माघार का घेतली? समोर आलं मोठं कारण
Parthiv Patel : बीसीसीआयने चीफ सिलेक्टर पदासाठी इच्छुकांचे अर्ज मागवले तेव्हा पार्थिव पटेल हा अर्ज करेल अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही. तेव्हा पार्थिवच्या नावाची चर्चा असताना सुद्धा त्याने चीफ सिलेक्टर पदाच्या शर्यतीतून माघार का घेतली याविषयी माहिती समोर आली आहे.
Parthiv Patel : बीसीसीआय चीफ सिलेक्टर पदाबाबत सध्या भारतीय क्रिकेट विश्वात खूप चर्चा सुरु आहे. माजी चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाल्यावर आता बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या चीफ सिलेक्टर पदासाठी इच्छुकांचे अर्ज मागवले होते. मात्र यादरम्यान माजी क्रिकेटर पार्थिव पटेल हा बीसीसीआय चीफ सिलेक्टर पदावर येणार त्याला ही जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा जोर धरू लागलेली. मात्र जेव्हा बीसीसीआयने चीफ सिलेक्टर पदासाठी इच्छुकांचे अर्ज मागवले तेव्हा पार्थिव पटेल हा अर्ज करेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही आणि पार्थिव पटेलने या पदासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा, त्यासोबतची जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याशी संबंधित आर्थिक बाबी, या विषयांवर एक गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
पार्थिव पटेल चीफ सिलेक्टर पदाच्या शर्यतीतून का बाजूला झाला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्थिवने आर्थिक कारणांचा हवाला देत ही प्रतिष्ठित जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. बीसीसीआय या पदासाठी तीन कोटी रुपयांचे वार्षिक वेतन देत होते. मात्र पार्थिवच्या दृष्टीने हा निर्णय फायद्याऐवजी मोठा आर्थिक तोटा ठरला असता. चीफ सिलेक्टर म्हणून काम करण्यासाठी त्याला आपल्या इतर व्यावसायिक जबाबदाऱ्या सोडाव्या लागल्या असत्या ज्यामध्ये गुजरात टायटन्ससोबतची प्रशिक्षकपदाची भूमिका आणि विविध व्यासपीठांवरील समालोचनाचे काम यांचा समावेश होता. या सर्व कामांतून मिळणारे त्याचे एकूण उत्पन्न बीसीसीआयच्या प्रस्तावापेक्षा कितीतरी पटीने अधिक होते.
प्रज्ञान ओझा तात्पुरता सांभाळतोय पदभार :
अजित आगरकरांचा कार्यकाळ संपल्यावर सिलेक्टर कमिटीरतील सदस्य प्रज्ञान ओझा सध्या दक्षिण विभागाचे निवडकर्ता प्रज्ञान ओझा ही जबाबदारी सांभाळत आहेत. तर पश्चिम विभागातून आणखी एक निवडकर्ता लवकरच यात सामील होण्याची अपेक्षा आहे. या पदासाठी वसीम जाफर आणि रमेश पोवार यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांवरही चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की देशातील सर्वोच्च क्रिकेट बोर्डाचा दर्जा पाहता निवडकर्त्यांना दिले जाणारे मानधन हे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना या भूमिकेकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे नाही.