माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने 2023 साली एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या दमदार खेळाडूला 2027 च्या वर्ल्डकप संघात स्थान देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच एक नाव सातत्याने चर्चेत आहे. मात्र दिनेश कार्तिकने या नावाला विरोध केला असून त्याच्या मते भारताच्या गोलंदाजीसंदर्भात चिंता व्यक्त होत असली तरी भारताकडे बरेच पर्याय आहेत. त्यामुळेच कार्तिकने या बड्या खेळाडूची संघात गरज नसल्याचं म्हटलं आहे.
कोण आहे हा क्रिकेटपटू?
आपण ज्या खेळाडूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, मोहम्मद शमी! वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यामध्ये भारतीय संघाने सुमार गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात 400 हून अधिक धावा करु दिल्या. तर तिसऱ्या सामन्यात 350 च्या लक्ष्याचा बाचवही भारतीय गोलंदाजांना करता आला नाही. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याची चर्चा सुरु असतानाच दिनेश कार्तिकने मात्र याविरोधात मत नोंदवलं आहे. पुन्हा एकदा शमीचा संघासाठी विचार करण्यात काही अर्थ नसल्याचं कार्तिकने म्हटलं आहे.
चाहत्यांकडून होतेय पुन्हा संधी देण्याची मागणी
शमीने 2025 साली भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शेवटचा एकदिवसीय सामना खेळाला होता. मात्र त्यानंतर अनेकदा प्रकृती आणि रिकव्हरीच्या कारणांमुळे त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. आपलं पद सोडत असलेले मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी कधीच शमीवर त्याच्या प्रकृतीमुळे विश्वास दाखवला नाही आणि तो त्यांच्या कार्यकाळात कायम संघाबाहेरच राहिला. शमीऐवजी आगरकर यांनी हर्षिक राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यासारख्या नवख्या खेळाडूंना संधी दिली. मात्र या नवख्या खेळाडूंना अनेकदा संधी देऊनही सामन्यावर छाप पाडण्यात यश आलेलं नाही. दुसरीकडे शमी घरगुती क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करतोय. त्यामुळेच त्याला पुन्हा संधी देण्याची जोरदार मागणी चाहत्यांकडून होतेय.
माजी सहकाऱ्याचं वेगळं मत
पण यावर कार्तिकचं मत वेगळं आहे. "नाही, माझ्यामध्ये इतर अनेक वेगवान गोलंदाजांचा पर्याय आहे. भारतीय संघ त्याला (शमीला) मागे सोडून कधीच पुढे निघाला आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. सध्या तो उत्तम गोलंदाजी करत असला तरी मी त्याचा विचार करणार नाही," असं कार्तिकने 'क्रिकबझ'शी बोलताना म्हटलंय.
इतर पर्याय कोणते?
शमीच्या गैरहजेरीमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना राणाने उत्तम साथ दिल्याचं कार्तिकचं मत असून त्यालाच संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून सिराजऐवजी अर्शदीपचा विचार केला जाऊ शकतो. गुरनूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा तिसरा गोलंदाज म्हणून विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप होत असून तिथे हीट द डेक म्हणजेच खेळपट्टीवर आदळल्यानंतर चेंडू जोरदार उसळतो, म्हणूनच या वरील पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
त्याची 2023 च्या वर्ल्डकपमधील कामगिरी
मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत केवळ 7 सामन्यांत सर्वाधिक 24 विकेट्स घेत ऐतिहासिक आणि अफाट कामगिरी केली. स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या सामन्यांत त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती, पण संघात पुनरागमन केल्यावर त्याने आपल्या अचूक आणि घातक गोलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देत भारताचा फायनलपर्यंतचा मार्ग सुखकर केला होता.