भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलने पूर्वाश्रमीची पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतरचा काळ आणि दारुचं व्यसन यासंदर्भात उघडपणे भाष्य केलं आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या पॉडकास्टवर चहलने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. घटस्फोटानंतर आयुष्यात नेमकं काय काय घडलं याबद्दल बोलताना मद्यपानाचं व्यसन लागलं होतं असं चहलनं म्हटलं आहे. तसेच या व्यसनामुळे कशाप्रकारे आपल्याला 'अँझायटी अटॅक'चा त्रास व्हायचा आणि त्यामधून आपण कसे बाहेर आलो यासंदर्भात माहिती दिली.
व्यसनमुक्ती केंद्रात राहिला
आकाश चोप्राच्या 'बैठ अँड बोल' या पॉडकास्टवर मद्यपान सोडण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाला उत्तर देताना चहलने, "मी खूप जास्त मद्यपान करु लागलो होतो. मी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मी ही सवय सोडवण्यासाठी एका व्यसनमुक्ती केंद्रातही गेलो होतो. मी तिथे 26 दिवस राहिलो. त्याचा मला बराच फायदा झाला. मद्यपानावर नियंत्रण कसे ठेवायचे—काय करावे आणि गोष्टी कशा हाताळाव्यात याची आता मला पूर्ण कल्पना आहे. या साऱ्याचा माझ्या आयुष्यात बदल घडवण्यास मदत झाली," असं सांगितलं.
वैयक्तिक आयुष्यातही परिणाम
मद्यपानाच्या व्यसनाचा फटका बसल्यानंतर सावरण्यासंदर्भात बोलताना चहलने, "यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मी गोष्टींकडे अधिक प्रगल्भतेने पाहायला लागलो आहे. माझ्या भावनांवर आता अधिक नियंत्रण आहे. माझ्या भावना संपल्या आहेत असा याचा अर्थ होत नाही पण आता त्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर उफाळूनही येत नाहीत," असं प्रांजळपणे मान्य केलं.
सारं काही पूर्वपदावर आलं
चहल त्याच्यामध्ये झालेल्या बदलासंदर्भात माहिती देताना पुढे म्हणाला, "मी आता परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये, मला असे वाटले की माझे शरीर पुन्हा 30 वर्षांच्या तरुणासारखे झाले आहे. मी जिममध्ये उत्तम सराव करत आहे, फील्डिंगचा सराव आणि इतर प्रशिक्षणही व्यवस्थित सुरू आहे. मद्यपानासारखी वाईट सवय आयुष्यातून निघून गेल्यावर सर्व काही पुन्हा सुरळीत झाल्याची जाणीव मला झाली. मी आता अधिक प्रगल्भ झालो आहे. कोणाशी संवाद साधण्यासाठी किंवा दैनंदिन कामे करण्यासाठी आता मला कोणत्याही अंमली पदार्थाची गरज भासत नाही."
आयपीएलची पहिली तीन वर्ष
चहलने सांगितले की, मद्यपानाशी संबंधित त्याच्या समस्या अगदी तरुण वयातच सुरू झाल्या होत्या. “सुरुवातीच्या काळात आम्ही पार्ट्यांमध्ये मद्यपान करायचो. तेव्हा आम्ही तरुण होतो. 2011 मध्ये जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा सलग तीन वर्षे आम्ही खूप पार्ट्या केल्या. तो आयुष्याचा एक वेगळा टप्पा होता. पण जोपर्यंत तुम्ही त्याबद्दल वाचत नाही किंवा शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो," असं चहल म्हणाला.
क्रिकेटवर परिणाम नाही
"मी मानसिकदृष्ट्या खंबीर असल्याने मद्यपानाच्या सवयीमुळे क्रिकेटच्या मैदानावर जरी माझी कामगिरी थेट प्रभावित झाली नव्हती, तरीही मी नक्कीच अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. माझे शरीर अधिक चांगल्या स्थितीत असू शकले असते. माझी गोलंदाजी ठीक होती, पण मी जिममध्ये अधिक मेहनत घेऊ शकलो असतो, गोष्टींमध्ये सुधारणा करू शकलो असतो," असं चहल प्रांजळपणे आपली चूक कबूल करताना म्हणाला.
वैयक्तिक आयुष्याचे मात्र खूप नुकसान
"मद्यपानाच्या सवयीचा माझ्या क्रिकेटवर फारसा परिणाम झाला नाही, पण माझ्या वैयक्तिक आयुष्याचे मात्र खूप नुकसान झाले. म्हणून मग मी ठरवले. आता हे सर्व मागे सोडून द्यायचे. आता मी आनंदी आहे. मी आयुष्याचा आनंद घेतो, मजा करतो, बाहेर फिरतो, गो-कार्टिंगला जातो, गोल्फ खेळतो. आता मी खूप चांगल्या स्थितीत आहे,” असं चहल म्हणाला.