WTC मध्ये आता 12 संघ दिसणार? झिम्बाब्वे सह भारताच्या शेजारील देशालाही मिळणार संधी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील सत्रात 12 संघ असू शकतात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या टॉड ग्रीनबर्गने याबाबत संकेत दिले आहेत. यात झिम्बाब्वे सह भारताच्या शेजारील देशालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील सत्रात एक मोठा बदल केला जाऊ शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या टॉड ग्रीनबर्गने असे संकेत दिलेत की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील सत्रात 12 संघ असू शकतात. वेगवेगळे क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीच्या पुढील फ्यूचर टूर्स प्रोग्रामला आता अंतिम रूप मिळण्याच्या जवळ आहे. एफटीपीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा फॉरमॅट लागू केला जाऊ शकतो.
2019 मध्ये सुरुवात झाल्यापासून अंतिम सामन्याच्या शर्यतीत नऊ संघांनी WTC मध्ये सहभाग घेतला असून, त्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत सहा टेस्ट सीरिज (तीन मायदेशात आणि तीन परदेशात) खेळल्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या या मालिकांमध्ये किमान दोन सामन्यांचा समावेश राहिला आहे. मात्र 2029-31 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलपासून लागू होणाऱ्या भविष्यातील आराखड्यात झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश करण्यासाठी सिंगल टेस्ट सिरीज खेळवली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील निर्णय बाली येथे पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत अपेक्षित आहे.
कमाईच्या बाबतीत कोणतीही तडजोड :
दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टेस्टच्यापूर्वी ग्रीनबर्गने डरबनमध्ये म्हटले की, 'मला वाटते की पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसाठी ही विशिष्ट संख्या निश्चित करण्यात आली आहे कारण त्यामागे प्रत्येक टेस्ट खेळणाऱ्या देशाला संधी देण्याचा उद्देश आहे. अखेरीस संबंधित देशांनाच काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. कारण जर आयसीसीकडून मिळणारा महसूल पूर्वी इतकाच राहिला नाही किंवा ते स्वतःचे FTP करार निश्चित करण्यात अपयशी ठरले, तर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करू शकत नाही'.
ग्रीनबर्गने आधी असं सांगितलं होतं की टेस्ट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत घट होऊ शकते. त्यांनी कोणत्याही विशिष्ट देशाचे नाव घेतले नाही, परंतु अलीकडेच क्रिकेट वेस्ट इंडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डेहरिंग यांनी त्यांच्या अलीकडील होम सीझनचे वर्णन 'मृत्यू, विनाश आणि सर्वनाश' असे केले; कारण त्यातून प्रसारण हक्कांद्वारे अत्यंत कमी महसूल मिळाला होता.