मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यातील इतर गरजांसाठी पालकांना मोठी रक्कम लागते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नियोजन करून गुंतवणूक सुरू केली तर दीर्घकाळात मोठा निधी तयार होऊ शकतो. म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी हा त्यासाठी वापरला जाणारा एक पर्याय आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास कंपाउंडिंगचा फायदा मिळू शकतो. दरमहा ₹5,000 एसआयपी केली आणि सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला, तर 15 वर्षांनंतर किती निधी तयार होऊ शकतो, याचे गणित समजून घेऊया.
समजा तुम्ही मुलाच्या भविष्यासाठी दर महिन्याला ₹5,000 एसआयपी सुरू केली. एका वर्षात तुमची एकूण गुंतवणूक ₹60,000 होईल. ही SIP सलग 15 वर्षे सुरू ठेवली तर तुमच्या खिशातून जाणारी एकूण रक्कम ₹9 लाख असेल. याचे साधे गणित असे ₹5,000 × 12 महिने × 15 वर्षे = ₹9,00,000. म्हणजे 15 वर्षांच्या कालावधीत तुम्ही एकूण ₹9 लाख गुंतवाल.
आता या गुंतवणुकीवर सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाल्याचे गृहीत धरू. मासिक कंपाउंडिंगच्या आधारावर ₹5,000 ची SIP 15 वर्षे सुरू ठेवल्यास अंदाजे ₹23,79,657 इतका निधी तयार होऊ शकतो.यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक ₹9 लाख आहे, तर अंदाजे ₹14,79,657 इतका परतावा मिळू शकतो. म्हणजेच एकूण फंड जवळपास ₹23.80 लाख होऊ शकतो.
मात्र हा आकडा निश्चित नाही. म्युच्युअल फंडातील परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो.
SIPमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्यामागे कंपाउंडिंग हा महत्त्वाचा घटक असतो. सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीत होणारी वाढ तुलनेने कमी दिसू शकते. मात्र कालावधी वाढत गेल्यावर आधी मिळालेल्या परताव्यावरही पुढील परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होते.यामुळे छोटी मासिक बचतही दीर्घकाळात मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू करताना शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे महत्त्वाचे ठरू शकते.
इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12% परतावा हा गृहीत धरलेला अंदाज आहे. तो कोणत्याही म्युच्युअल फंडाकडून हमीने मिळणारा परतावा नाही. बाजाराशी संबंधित गुंतवणुकीत परतावा कमी-जास्त होऊ शकतो आणि गुंतवलेल्या पैशाची बाजारमूल्यही वाढू किंवा घटू शकते.त्यामुळे ₹23,79,657 ही रक्कम फक्त 12% सरासरी परतावा गृहीत धरून केलेली गणना आहे. प्रत्यक्षात मिळणारा अंतिम निधी बाजारातील परिस्थिती, गुंतवणुकीचा प्रकार आणि परताव्याच्या दरावर अवलंबून असेल.
उत्पन्न दरवर्षी वाढत असेल तर एसआयपीची रक्कमही हळूहळू वाढवता येते. याला स्टेप अप एसआयपी म्हटले जाते. उदाहरणार्थ, ₹5,000 पासून सुरुवात करून दरवर्षी ठराविक टक्केवारीने एसआयपीवाढवली तर 15 वर्षांनंतर तयार होणारा निधी साध्या ₹5,000 मासिक SIPपेक्षा वेगळा आणि मोठा असू शकतो.
(Desclaimer: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित योजनेची माहिती समजून घ्या. आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)