सणासुदीच्या काळात घर किंवा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक ऑफ बडोदाची नवी ऑफर तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने गृहकर्ज, कार लोन, इलेक्ट्रिक वाहन कर्ज, बचत खाती आणि डेबिट कार्ड खरेदीवर विविध फायदे जाहीर केले आहेत. महिलांसाठी गृहकर्जाच्या व्याजदरात अतिरिक्त सवलत असून, छोट्या व्यावसायिकांसाठीही कर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. काय आहेत नेमक्या योजना? याचा ग्राहकांना कसा फायदा होणारेय? सविस्तर जाणून घेऊया.
बँकेच्या सणासुदीच्या मोहिमेनुसार गृहकर्जाचे सुरुवातीचे व्याजदर वार्षिक 7.40% आहेत. पात्र ग्राहकांना प्रक्रिया शुल्कात पूर्ण सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. महिलांना व्याजदरात अतिरिक्त 0.05 टक्केची सवलत मिळू शकते. तसेच, 40 वर्षांखालील पात्र ग्राहक आणि बँकेत वेतन खाते असलेल्या काही सरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील तसेच कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना 0.10 टक्के-बिंदूंची अतिरिक्त सवलत लागू होऊ शकते.
नवीन कार खरेदीसाठी बँकेने कार लोनचे सुरुवातीचे व्याजदर वार्षिक 7.85% ठेवले आहेत. अर्जाची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या पात्र ग्राहकांना बँक ऑफ बडोदा ग्रीन व्हील्स योजनेअंतर्गत व्याजदरात अतिरिक्त 0.15 टक्के-बिंदूंची सवलत मिळू शकते. कर्जफेडीसाठी अधिक कालावधीचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
महिला ग्राहकांसाठी बँकेने दोन खात्यांशी संबंधित सुविधा अधोरेखित केल्या आहेत. बँक ऑफ बडोदा ग्लोबल वुमन एनआरई/एनआरओ सेव्हिंग अकाऊंटमध्ये ऑटो स्वीप सुविधा आणि वैयक्तिक अपघात तसेच हवाई अपघात विमा संरक्षणासारखे लाभ आहेत. हे खाते पात्र एनआरई/एनआरओ ग्राहकांसाठी आहे. बीओबी वुमन सफिर सेविंग अकाऊंट्समध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कॅन्सर केअर कव्हर, कुटुंबीयांसाठी ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला आणि टियारा क्रेडीट कार्डशी संबंधित विशेष ऑफरचा समावेश असल्याची माहिती देण्यात आलीय.
बँक ऑफ बडोदाच्या डेबिट कार्डधारकांना निवडक व्यापारी आणि ब्रँडमार्फत खरेदी, खाद्यपदार्थ, प्रवास आणि किराणा खरेदीवर तात्काळ सवलती मिळू शकतात. मात्र, प्रत्येक ऑफरची वैधता, किमान खरेदीची अट आणि कमाल सवलत वेगवेगळी असू शकते. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी संबंधित ऑफरचे नियम तपासणे फायदेशीर ठरेल, असे मार्केट एक्स्पर्टे सांगतात.
या मोहिमेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीही वित्तपुरवठ्याचे पर्याय आहेत. बँक ऑफ बडोदा ग्रीन प्लग अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि बॅटरी स्वॅपिंग सुविधांसाठी 5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. महिला उद्योजकांसाठी बरोडा महिला स्वावलंबन ही तारणमुक्त वित्तपुरवठा योजना देखील आहे. नियमित बचतीसाठी बीओबी फ्लेक्सी सिस्टेमॅटीक डिपॉझिट प्लानमध्ये दरमहा 500 रुपयांपासून बचत सुरू करता येणार आहे.
केवळ जाहिरातीत दिलेला सुरुवातीचा व्याजदर पाहून कर्ज घेऊ नका. तुमचा अंतिम दर, कर्जाचा कालावधी, एकूण व्याज आणि पात्र सवलती यांची तुलना करूनच निर्णय घ्या, असे आवाहन एक्सपर्ट करतात. मुंबई आणि महाराष्ट्रातील ग्राहकही जवळच्या बँक शाखेत किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून लागू अटी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.