मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या या पर्वताचा थेट रामायणाशी संबंध आहे. तुम्हाला देखील हे ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरंय. मुंबईपासून हे ठिकाण अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पण 99 टक्के लोकांना याबाबत माहिती नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे द्रोणागिरी पर्वत आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेला किल्ला आहे.
उरण एसटी स्थानकासमोर आणि करंजा परिसराजवळ हा डोंगर आहे. प्राचीन काळात उरण बंदराच्या रक्षणासाठी या डोंगरावर किल्ला बांधण्यात आला होता. देवदिरीच्या यादवांच्या ताब्यात सुरुवातीला हा किल्ला होता. 1530मध्ये पोर्तुगीजांनी यादवांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर मात्र पाचव्या शतकात आदिलशाही व ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
द्रोणागिरी किल्ला हा ट्रेकर्ससाठीदेखील खूप प्रसिद्ध आहे. उरण शहराकडून करंजा गावाकडे जाताना मार्गावर डाव्या बाजूला दाट झाडी; तर उजव्या बाजूला डोंगररांगा आहेत. गावात प्रवेश केल्यावर मंदिराकडे जाणारी पायवाट नजरेस पडते. गड चढण्यासाठी सुमारे 45 मिनिटे लागतात. सध्या येथे पाण्याचे ऐतिहासिक हौद आणि काही अवशेष पाहायला मिळतात.
श्रीराम-रावण युद्धात बाण लागून मुर्च्छित पडलेल्या लक्ष्मणासाठी औषधी आणण्यास गेलेल्या मारुतीने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. या पर्वतासह उड्डाण करून हनुमान करंजा बेटावरून जात असताना त्याचा काही भाग या बेटावर पडला. तोच भाग द्रोणागिरी पर्वत म्हणून ओळखला जाऊ लागला. या किल्ल्याच्या मातीत आजही अशा काही औषधी वनस्पती आढळतात ज्या सामान्यतः कोकणात दिसत नाहीत.
येथील स्थानिकांमध्ये या पर्वताला व येथील 'द्रोणागिरी आई' (उरणावती देवी) यांना मानले जाते. तसंच, येथील द्रोणागिरी पर्वतावरील किल्ल्यावर द्रोणागिरी आईचे मंदिर प्रसिद्ध आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या या देवीवर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. सात पाड्यांची देवी म्हणूनही या देवीला संबोधले जाते. अभ्यासकांच्या मते, द्रोणागिरीतील गुंफा म्हणजे जकात वसुलीची शुल्कशाळा असावी. याशिवाय समुद्राची अधिष्ठात्री देवता मणिभद्र व मणिमेखल यांचीही येथे स्थाने आहेत.