देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. बँकेवरील सायबर हल्ल्याच्या बातमीला बँकेकडूनही दुजारा मिळाल्यानंतर बँकिंग क्षेत्रासह देशभरात खळबळ माजली आहे. त्यासोबत सर्वात जास्त एसबीआय बँकेत अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ही गोष्ट लक्षात घेत स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वाची अपडेट देणारे पत्रक जारी केलं आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर एक पत्रक शेअर केलं आहे. या पत्रकात त्यांनी सांगितलंय की, ज्या ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे, त्यांना बँकेकडून ईमेल आणि व्हॉट्सॲपवर वैयक्तिकरित्या माहिती देण्यात आली आहे. सोबत ग्राहकांना कळवण्यात आलं की, त्यांच्या अकाऊंटमधील ठेवी आणि शिल्लक रक्कम सुरक्षित आहे. त्यांनी पुढे असंही नमूद केलंय की, अशीच एक घटना जुलै महिन्यात बँक ऑफ बडोदामध्ये घडली होती.
https://t.co/lrIZtM5nnQ
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 23, 2026
ज्या ग्राहकांना त्यांचा डेटा लीक झाला अशी माहिती दिली आहे, त्या ग्राहकांना एसबीआयने काही गोष्टीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, या ग्राहकांनी खास करुन डिजिटल बँकिंग वापरताना जास्त काळजी घ्यायची आहे. ग्राहकांनी आपला ओटीपी, एटीएम किंवा डेबिट कार्ड पिन आणि पासवर्ड कोणासोबतही काही झालं तरी शेअर करू नये. तसंच, त्यांना संशयास्पद फोन कॉल्स, मेसेजेस आणि ईमेल्स आल्यास त्याची लगेचच तक्रार नोंदवायची आहे. शिवाय अशा गोष्टीशी डील करताना सावध राहायचं आहे. एसबीआयने ग्राहकांना सांगितलंय की त्यांनी काळजी करायची गरज नसून या घटनेची चौकशी सुरू आहे.
एसबीआयने यापूर्वीच जाहीर केलं आहे की, या डेटा लीकमध्ये ग्राहकांची नावे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ईमेल पत्ते, घराचे पत्ते, शाखा आणि ग्राहक आयडी क्रमांक, तसंच कर्ज आणि लीड रेकॉर्डश आहेत.
दरम्यान ग्रँट थॉर्नटन इंडियाचे भागीदार विवेक अय्यर हे या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, डिजिटायझेशन आणि एआयमुळे सायबर हल्ल्यांची व्याप्ती सातत्याने बदलत असल्याचे पाहिला मिळत आहे. ही सध्याच्या स्थितीमधील सर्वात चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेत भविष्यात वित्तीय संस्थांनी केवळ त्यांची सायबर सुरक्षाच नव्हे, तर त्यांची सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर्स देखील मजबूत करणे अतिशय गरजेचे झाली आहेत.