मुंबईच्या पर्यटनात काही महिन्यांत आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार असून पर्यटकांना लवकरच पाण्यातील काचेच्या बोगद्यातून रंगीबेरंगी जलचरांचे जग न्याहाळता येईल. भायखळ्याच्या जिजामाता भोसले उद्यानात अत्याधुनिक मत्स्यालयाची निर्मिती केली जात आहे. मत्स्यालयाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिल्या. आयुक्तांनी काही आठवड्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली. मत्स्यालय पाहण्याची संधी जानेवारी 2027 मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पेंग्विन कक्षाचा विस्तार
जलचरांसाठी नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्कची व्यवस्था असेल. प्रयोगशाळा, लाइफ सपोर्ट सिस्टीमसह क्वारंटाइन सुविधांचे बांधकाम केले जाईल. जलचरांचे आरोग्य आणि पाण्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी स्वतंत्र 'लाइफ सपोर्ट सिस्टीम' असेल. अॅक्रेलिक पॅनेल्सच्या माध्यमातून पाण्याखालील दृश्ये प्रमाणावर खुली दिसतील, अशी रचना प्रस्तावित आहे. पेंग्विन कक्षाच्या मागील बाजूस असलेल्या अतिरिक्त जागेवर प्लॅटफॉर्म बांधून आणि तसेच छतावर अतिरिक्त अॅक्रेलिक पॅनेल बसवून पेंग्विन कक्षाच्या जागेत वाढ केली जाईल.
62 कोटी रुपयांचा खर्च
सुमारे 60 ते 70 प्रकारचे सागरी जीव या मस्त्यालयामध्ये पाहायला मिळतील. यात भारतीय समुद्रातील मासे आणि रंगीबेरंगी कोरल फिश दाखवले जातील. या मत्स्यालयासाठी अंदाजे 62 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सुमारे 5500 चौरस फूट क्षेत्रावर हे मत्स्यालय परसरेलं असेल. या मत्स्यालयाचं 50 टक्क्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे.
इथं काय काय असणार?
घुमटाकार मत्स्यालय : प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांचे आगमन होताच त्यांचे स्वागत छतामधील घुमटाकार मत्स्यालयात होईल.
चालत फिरता येणारा बोगदा: मत्स्यालय हे अॅक्रेलिक पॅनल्समध्ये बनवलेले दोन थीम बोगद्यांचं मत्स्यालय असेल. त्यात 14 मीटर लांबीचा कोरल फिश बोगदा आणि 36 मीटर लांबीचा खोल महासागर बोगदा असेल. त्यातून चालत जाताना पर्यटकांना जलचर जीवनाचा अनुभव घेता येईल.
3 पॉप-अप विंडो : एका वेळी तीन व्यक्त्ती सामावून घेणारी पॉप-अप विंडो असेल. त्यातून मत्स्यालय 360 अंश कोनातून पाहता येईल.
आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या: बोगद्यात मत्स्यालयाव्यतिरिक्त अॅक्रेलिक पॅनल्समध्ये बनवलेल्या चार आयताकृती, पाच वर्तुळाकार आणि दोन अर्धगोलाकार टाक्या प्रस्तावित आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारचे मत्स्यजीव असतील.
मेमोरीअल दुकान : मत्स्यालय पाहून बाहेर पडताना मेमोरीअल दुकानाला भेट देता येईल. तिथे वन्यजीव, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणीय पैलू, जलचर इत्यादींशी संबंधित पुस्तके, वस्तू, खेळणी, वाद्ये, कापडे इत्यादींची खरेदी करता येईल.