लोक म्हणाले, गेला वाटतं; अशोक सराफांनी सांगितली त्या अपघाताची आठवण; 3 दिवसांनी आली शुद्ध!
लोक म्हणाले, गेला वाटतं; अशोक सराफांनी सांगितली त्या अपघाताची आठवण; 3 दिवसांनी आली शुद्ध!
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. पण त्यांची स्टाईल, साधेपणा याचे चाहतेही खूप आहेत. ज्यांना अशोक मामांच्या जुन्या आठवणी ऐकण्यात खूप रस असतो.दरम्यान अशोक सरफा यांनी आपल्या आयुष्यातील एका थरारक प्रसंगाची आठवण अलीकडेच सांगितली. 1987 मध्ये मुंबईहून कोल्हापूरला जात असताना खेड-शिवापूरजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तब्बल तीन दिवसांनी शुद्धीवर आल्याचे त्यांनी सांगितले. एका अनोळखी व्यक्तीने वेळेवर मदत केल्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचता आल्याची आठवणही त्यांनी सांगितली. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अनुभव सांगितला.
कोल्हापुरला शूटिंगला जाताना अपघात
अशोक सराफ त्यावेळी मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. दुसऱ्या दिवशी त्यांना कोल्हापूरला शूटिंगसाठी जायचे होते. मात्र, हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याने सेट उभारला असल्याने आणखी एक दिवस मुंबईत थांबण्याची विनंती केली. अशोक सराफ यांनी ती मान्य केली. त्यांच्याकडे रेल्वेचे तिकीट होते; पण निर्मात्याने स्वतःची गाडी आणि चालक दिल्याने त्यांनी रेल्वे प्रवास रद्द केल्याचे त्यांनी ‘मित्र म्हणे’ मध्ये सांगितले.
खेड-शिवापूरजवळ कारची ट्रकला धडक
दिवसभर शूटिंग केल्यानंतर रात्री साधारण दहाच्या सुमारास ते मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले. ठाण्यापर्यंत आल्यानंतर त्यांना गाडीत झोप लागली. सकाळी आठच्या सुमारास गाडी खेड-शिवापूर परिसरात पोहोचली. त्यावेळी चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; मात्र समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज चुकल्याने कारची जोरदार धडक झाली. अपघाताच्या वेळी आपण झोपेत असल्याने नेमके काय घडले?, याची आठवण नसल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.
मणक्याला दुखापत
या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. अपघातानंतर आपण गाडीतून बाहेर कसे पडलो, हेही आठवत नसल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले. गाडीची अवस्था इतकी खराब झाली होती की रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना त्यांची ओळख पटली नाही. एका बंगाली व्यक्तीने त्यांना ओळखले आणि मदतीसाठी पुढाकार घेतला.
अनोळखी व्यक्तीने एसटीतून रुग्णालयात सोडले
त्या व्यक्तीने अशोक सराफ यांना उचलून एसटी बसमध्ये ठेवले आणि पुण्यातील ससून रुग्णालयात नेले. तिथे एका पंजाबी महिलेने त्यांना ओळखले. तिने पुणे गेस्टहाऊसला फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अजय सरपोतदार यांनी धाव घेतली आणि त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्याची आठवण अशोक सराफ यांनी सांगितली.
सहा महिन्यांनंतर पुन्हा कामाला सुरुवात
अपघातानंतर अशोक सराफ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास सहा महिने उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केले. पुढील दोन ते तीन वर्षांत चित्रपटांचे शूटींग करताना मानेची हालचाल व्यवस्थित करता येत नसल्याने अडचणी येत होत्या. पण यावर मात करत त्यांनी जिद्दीने आपले काम पुन्हा त्याच जोमाने सुरु ठेवले.