लोकप्रिय दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. 11 नोव्हेंबर रोजी त्यांनी गर्लफ्रेंड रितुजा जयंत हिच्याशी लग्न केले आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन त्यांनी लग्नाची गुड न्यूज दिली आहे. अविनाश अरुण यांनी मराठीत गाजलेला चित्रपट किल्ला याचे आणि पाताल लोक या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.
अविनाश अरुण यांनी इन्स्टाग्रामवर रितुजासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी 11.11.26 आम्ही एक इच्छा मागितली आणि ती पूर्ण झाली. असं कॅप्शन दिलं आहे. तर, या पोस्टला जस्ट मॅरीड असा हॅशटॅगही दिला आहे. अविनाश यांच्या या पोस्टला अनेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश अरुण यांच्या पोस्टवर चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ललित प्रभाकर, शरद केळकर, अली फैजल, मोना सिंह यांनीही कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अविनाश यांचेही दुसरे लग्न असून याआधी त्याचे लग्न मराठी अभिनेत्री कादंबरी कदमसोबत झालं होतं. अविनाश आणि कादंबरी यांनी 10 नोव्हेंबर 2016रोजी लग्न केले होतं. त्यांना कार्तिक नावाचा एक मुलगा आहे. मात्र नऊ वर्षांच्या संसारानंतर 2025 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता अविनाश यांनी रितुजा जयंतशी लग्न करुन वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.
अविनाश अरुण यांनी किल्ला, थ्री ऑफ अस, गाजलेली सिरीज पाताल लोक, स्कुल ऑफ लाइज, प्रहारः द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम या कलाकृतीचं दिग्दर्शन केलं आहे. अविनाश अरुण हे सिनेमॅटोग्राफरदेखील आहेत. मसान, दृश्यम, मदारी व हिचकीचे सिनेमॅटोग्राफर होते.
त्यांच्या ‘किल्ला’ या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक मिळवलं होतं. या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिस्टल बेअर पुरस्कार मिळाला होता. तसंच 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मानही मिळाला होता.
अविनाश अरुण सध्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. राजकुमार राव या चित्रपटात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत.