राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही संघटनात्मक विस्तारासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून बारामतीमध्ये नव्या शाखा सुरू करण्यासह पक्ष कार्यालय उभारण्याचे नियोजन आहे. या घडामोडींमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.यावर शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटना मजबूत करण्याची जबाबदारी उदय सामंत आणि सचिन अहिर यांच्याकडे दिल्याचे सांगण्यात येतंय. त्यानुसार दोन्ही नेत्यांनी बारामती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पातळीवरील संघटनेचा आढावा घेणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि पक्षाची विस्कटलेली संघटनात्मक बांधणी पुन्हा मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
बारामती शहरात शिवसेनेच्या नव्या शाखा सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याचबरोबर पंचायत समितीसमोर पक्षाचे कार्यालय म्हणून ‘एकनाथ भवन’ सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या या ठिकाणी व्यायामशाळा असून, या जागेची उदय सामंत आणि सचिन अहिर पाहणी करणार आहे. नव्या शाखा आणि पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे.
बारामतीत शिवसेनेचे पाय रोवण्यासाठी आला आहात का, असा प्रश्न उदय सामंत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीतील प्रत्येक पक्षाला स्वतःची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. कोणत्याही पक्षाला आव्हान देणे किंवा त्याचे अस्तित्व संपवणे हा शिवसेनेचा उद्देश नाही, असे सामंत म्हणाले. पुणे जिल्ह्यात पक्षाची संघटना वाढावी आणि कार्यकर्त्यांना बळ मिळावे, यासाठी हा दौरा असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक दौऱ्यानिमित्त बारामतीत आलेल्या उदय सामंत यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी मोठे काम केले, असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच संघटनात्मक दौऱ्यानिमित्त बारामतीत आल्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
बारामती मध्ये संघटना वाढावी पुणे जिल्ह्यात संघटना वाढावी यासाठी उदय सांमत आणि सचिन अहिर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिलीये.. मात्र कोणत्याही पक्षाला चॅलेंज देण्यासाठी आलो नाही त्यांच्यापेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवून हा उद्देश आहे. असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. बारामती,पुण्यात संघटना वाढावी हा या मागचा हेतू असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आपली राजकीय ताकद वाढवण्याची गरज आहे. पुणे महापालिकेत पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेत पाच सदस्य आणि काही नगरपरिषदांमध्ये पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेची पुनर्बांधणी करण्यावर पक्षाचा भर आहे. बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी शाखाविस्तार आणि पक्ष कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली त्याचाच भाग मानल्या जात आहेत.