भविष्यातील जग हे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असेल, ज्याला एआयशी जळवून घेता येणार नाही तो कालबाह्य होईल अशी अनेक विधानं मागील काही काळात आपण ऐकली, वाचली असतील. मात्र एकीकडे एआयच्या उज्ज्वल भविष्याबद्दलची भविष्यवाणी केली जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र एआयविरुद्ध आता लोक थेट रस्त्यावर उतरू लागले आहेत. एआयविरुद्धच्या या संतापाची प्रचिती अमेरिका आणि युरोपमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनांवरुन दिसून येत आहे. एआयचा वाढता वापर जगभर चर्चेत असतानाच त्याविरोधात लोक थेट रस्त्यावर का उतरत आहेत? नेमका हा प्रकार काय? समजून घेऊयात...
एआयविरुद्ध लोक रस्त्यावर का उतरले?
एआयविरोधात अमेरिका आणि युरोपमधील अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उत्तरल्याचं पाहायला मिळत आहे. आता अचानक एआयविरुद्ध लोक रस्त्यावर येण्याचं कारण काय तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या अनेकांना एआय हे मानवी भविष्यासाठी धोकादायक वाटत आहे.'एआय'मुळे नोकऱ्यांवर गदा येत असून, एआयसंदर्भातील माहिती स्टोअर करुन ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डेटा सेंटरसाठी होणाऱ्या वीज आणि पाण्याच्या प्रचंड वापराला आंदोलकांचा विरोध आहे. डेटा सेंटरमुळे पर्यावरणावर होणारे दृष्परिणाम, यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. एआयविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या संतप्त आंदोलक मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्येही घुसल्याचं पाहायला मिळालं.
आंदोलन कोणी आयोजित केलेलं?
पर्यावरणवादी संघटना, स्थानिक नागरिकांचे गट आणि डिजिटल अधिकारांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी ही आंदोलने 'स्टॉप डर्टी डेटा सेंटर्स' या मोहिमेअंतर्गत आयोजित केली होती.
कुठे आणि कशी झाली आंदोलनं?
आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे डेटा सेंटरच्या वाढत्या विस्ताराविरोधात सुमारे दोन हजार नागरिकांनी मोर्चा काढला. डब्लिनमध्ये आंदोलकांनी पर्नेल स्क्वेअर येथून आयरिश संसदेपर्यंत मोर्चा काढला. नव्या डेटा सेंटरच्या उभारणीला परवानगी देण्यापूर्वी त्यांचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम तपासावा, अशी त्यांची मागणी होती.
फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे जवळपास 1 हजार 300 हून अधिक लोक या आंदोलनात सहभागी झाले. फिनलंडमधील अन्य काही शहरांमध्येही एआयविरोधात निदर्शने करण्यात आली.
मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये घुसले
6 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. मायक्रोसॉफ्टच्या नव्या डेटा सेंटरच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शंभरहून अधिक आंदोलकांनी प्रवेश केला. काही आंदोलक क्रेनवर चढले, तर काहींनी येथील काही गोष्टींना आग लावून पेटवत निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांशीही त्यांची झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 200 जणांना ताब्यात घेतले.