एका लहानशा गावातील गोठ्यात वर्षानूवर्षे एक दगड थांबाला आधार म्हणून वापरला जात होता. प्रथमदर्शनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो सामान्य दगडाचाच तुकडा वाटत होता. पण अचानक एकदिवशी मालकाला या दगडबाबात असं काही समजलं की तोदेखील आश्चर्यचकित झाला. ज्या दगडाला तो सामान्य समजत होता ती शिळा सामान्य नसून कांस्ययुगातील 3000 वर्ष जुनी एक आठवण होती.
2007 साली झेक प्रजासत्ताक (Czech Republic) मधील मोर्कुव्हकी (Morkůvky) गावात जे. टोमानेक (J. Tomanec) नावाच्या व्यक्तीला त्याच्या बागेत एक विचित्र आयताकृती दगड सापडला होता. सुरुवातीला हा दगड त्यांच्या जुन्या गोठ्याचा (Barn) पाया मजबूत करण्यासाठी एका साध्या बांधकामाच्या विटासारखा वापरला जात होता. मात्र, जेव्हा स्थानिक पुरातत्वशास्त्रज्ञांनी या दगडाची बारकाईने तपासणी केली, तेव्हा समोर आलेले सत्य अत्यंत थक्क करणारे होते.
हा साधासुधा दगड नसून तब्बल 3,350 वर्षे जुना, कांस्य युगातील (Bronze Age) शस्त्रे बनवण्याचा साचा (Casting Mould) असल्याचे सिद्ध झाले. या दगडाच्या बाजूला एक अचूक कोरीव खळगा होता. ज्याचा वापर वितळलेले धातू ओतून भाल्याची टोकदार टोके तयार करण्यासाठी केला जात होता.
पुरातत्वविभागाने केलेल्या अभ्यासादरम्यान, दगडावर वारंवार उष्णता मिळाल्यामुळं काळे डाग आणि जुन्या धातुकामाचे अवशेष सापडले आहेत. तर हे दोन्ही साचे एकत्र बांधण्यासाठी तांब्याच्या तारेचा वापर केला गेला होता. हा साचा र्हायोलाइट टफ नावाच्या ज्वालामुखीय खडकापासून बनवला गेला होता.
संशोधकांच्या मते, हा खडक मूळचा कार्पेथियन प्रदेशातील (बहुदा उत्तर हंगेरी) असावा, जिथून प्राचीन काळातील व्यापाऱ्यांनी किंवा कारागिरांनी तो शेकडो किलोमीटर दूर झेक प्रजासत्ताकात आणला होता. या ऐतिहासिक मौल्यवान साच्याला २०१९ मध्ये मोरावियन संग्रहालयाकडे (Moravian Museum) सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर यावर सखोल वैज्ञानिक संशोधन झाले आणि 2025-26 मध्ये हे जागतिक पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आले.