मायक्रोसॉफ्ट ही जगभरात प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. कंपनीच्या कामात काही अडथळा आला तर जगभरात त्याचे पडसाद दिसतात. दरम्यान
मायक्रोसॉफ्टसारख्या आघाडीच्या टेक कंपनीत काम करण्याची इच्छा अनेक तरुणांची असते. मात्र बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच कंपनीत नियमित नोकरी मिळते, असे नाही. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट असते. मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत करिअर पोर्टलवर भारतातील तांत्रिक, क्लाउड सेवा, ग्राहक सहाय्य, विक्री आणि उत्पादन विकास अशा विविध क्षेत्रांतील पदांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे उमेदवारांनी पदानुसार पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये कशी मिळते नोकरी? काय लागते पात्रता? कुठे करायचा असतो अर्ज? सविस्तर जाणून घेऊया.
मायक्रोसॉफ्ट विद्यार्थ्यांसाठी अर्ली इन प्रोफेशन आणि एक्स्प्लोअर मायक्रोसॉफ्ट यांसारखे कार्यक्रम राबवते. एक्स्प्लोअर मायक्रोसॉफ्ट हा प्रामुख्याने पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठ आठवड्यांचा इंटर्नशिप कार्यक्रम आहे. यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची मूलभूत कौशल्ये, प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम आणि टीममध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो. भारतातील या कार्यक्रमासाठी संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित करिअर करायचे असल्यास कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान, प्रोग्रामिंग, समस्या सोडवण्याची क्षमता, संवादकौशल्य आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व विकसित करणे उपयुक्त ठरेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स, आयटी, डेटा सायन्स किंवा संबंधित विषयांचा अभ्यास करावा लागेल. असे असले तरी प्रत्येक पदासाठी आवश्यक कौशल्ये वेगळी असू शकतात, याची नोंद घ्या.
मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार उमेदवाराने प्रथम उपलब्ध पद शोधा. त्यानंतर संबंधित पात्रता तपासून करिअर पोर्टलवर प्रोफाइल तयार करावे आणि अर्ज सादर करावा. पदानुसार मुलाखत, तांत्रिक कौशल्यांची चाचणी किंवा इतर मूल्यांकन होऊ शकते. अर्ज केल्यानंतर निवड निश्चित होतेच असे नाही. कंपनीच्या अधिकृत हायरिंग एफएक्यूसमध्ये अर्ज आणि निवड प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
मायक्रोसॉफ्टमधील पगार हा पद, अनुभव, कौशल्ये आणि नोकरीच्या ठिकाणानुसार बदलतो. बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकच निश्चित वेतन सांगता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील किंवा इतर वेबसाइटवरील पगाराचे आकडे अधिकृत ऑफर समजून स्वीकारू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नोकरी आणि इंटर्नशिपच्या संधींसाठी careers.microsoft.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भारत किंवा संबंधित शहर निवडून पद शोधता येते. मुंबई, बेंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद आणि नोएडा येथे कंपनीची कार्यालये आहेत.