कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगात खळबळ! व्हायरसने शास्त्रज्ञांची झोप उडवली; WHOकडून अलर्ट जारी
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने एन्ट्री घेतली आहे. अमेरिका, स्पेन, फ्रान्स, सिंगापूरमध्ये वेगानं प्रसार होत आहे. WHOकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
PJ.2.1 : जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा रंगली आहे. हा नवा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये पसरला असून त्यानंतर आरोग्य यंत्रणांना सज्ज झाली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सर्वप्रथम मे २०२६ मध्ये कॅनडाच्या ओंटारियोमध्ये समोर आला होता आणि आता तो अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच आशियातील काही भागांपर्यंत पोहोचला आहे. हा नवीन व्हेरिएंट संसर्गाची नवी लाट आणू शकतो की नाही? याचा तज्ज्ञ शोध घेत आहेत.
कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गाचा कहर जगानं २०२० मध्ये अनुभवला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी जीव गमावला. संपूर्ण जगानं लॉकडाऊन पाहिला. या कटू आठवणी आजही ताज्या असताना कोरोना विषाणू एका नवीन रूपात परतला आहे. कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे.
हा व्हेरिएंट अमेरिका, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगाच्या विविध भागांत वेगाने पसरत आहे. या व्हेरिएंटला'PJ.2.1' असं नाव देण्यात आले. या नवीन प्रकाराने जगभरातील शास्त्रज्ञांना चिंतेत टाकलं असून जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचा इशारा दिला आहे.
कसा आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट?
नवा व्हेरिएंट एकाच वेळी म्यूटेशन करतोय. याला 'सॉल्टेशन व्हेरिएंट' असे म्हटलं जातं. मानवी पेशींच्या पृष्ठभागावरील 'एसी टू'शी जोडला जातो. वाढलेल्या बाइंडिंग क्षमतेमुळे वेगानं पसरतो. मानवी पेशींवर हल्ला करत असल्याचा दावा केला जात आहे. भारतात आतापर्यंत या नवीन व्हेरिएंट आलेला नसला तरी देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.
नव्या व्हेरिएंट PJ.2.1 ची लक्षणं सामान्य सर्दी-ताप आणि फ्लूशी मिळतीजुळती आहेत. केवळ लक्षणांवरून सामान्य विषाणूजन्य संसर्ग आणि कोविडचा हा नवीन प्रकार यांमधील फरक ओळखणे कठीण असल्याने, गरज पडल्यास चाचणी करणे हाच सर्वात प्रभावी उपाय ठरतो.
जरी हा नवीन प्रकार अनेक देशांमध्ये पसरत असला, तरी सध्या कोणताच जागतिक धोका नसल्याचं बोललं जात आहे. मात्र खबरदारी घ्या, गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहा, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक ठरू शकतो? येत्या काही दिवसांत संशोधनाच्या आधारावर हे स्पष्ट होऊ शकेल. परिणामी कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढली.
नव्या व्हेरिएंटची लक्षणं काय?
थंडी, ताप येणे
थकवा
डोकेदुखी
नाक चोंदणे
घसा खवखवणे
स्नायूंमध्ये वेदना