इजिप्तची राजधानी कैरोजवळ एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. 8 नोव्हेंबर 2026 रोजी कैरोजवळ, गिझाहून फयुमला जाणारी ट्रेन आणि कैरोहून अस्वान शहराकडे जाणारी दुसरी ट्रेन एकमेकांवर आदळली, ज्यामुळे अनेक डबे रुळावरून घसरले. या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण दुर्घटनेवर दुःख व्यक्त करताना, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले की, "ज्याचाही निष्काळजीपणा दिसून येईल, त्याला सोडले जाणार नाही. जबाबदार व्यक्तींना नक्कीच शिक्षा दिली जाईल."
रेल्वे प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी ढिगारा हटवण्यासाठी अनेक क्रेनचा वापर केला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ही घटना गिझा (Giza) भागातील अल-अयात (Al-Ayyat) येथे घडल. हे असे ठिकाण आहे जिथे यापूर्वीही इजिप्तच्या इतिहासातील काही अत्यंत भीषण रेल्वे अपघात घडले आहेत.
2002 मध्ये, कैरोच्या दक्षिणेस सुट्टीसाठी निघालेल्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका रेल्वेगाडीला आग लागली होती, ज्यामध्ये 370 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 2009 मध्ये, त्याच भागात रेल्वेचे अनेक अपघात झाले, ज्यात डझनभर लोकांचा बळी गेला.
संपूर्ण आफ्रिकेतील सर्वात मोठे रेल्वे जाळे असूनही, इजिप्तमध्ये वारंवार रेल्वे अपघात होत आहेत. 11 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला इजिप्त आपल्या रेल्वे व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. असे असूनही, अशा जीवघेण्या घटना वारंवार घडत असल्याने इजिप्तच्या रेल्वे प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गेल्या दशकात इजिप्तने आपल्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. ज्यामध्ये नवीन महामार्ग आणि हाय-स्पीड रेल्वे मार्गांचा समावेश आहे. तरीही त्यांच्या जुन्या रेल्वे नेटवर्कचा मोठा भाग अजूनही सर्वसमावेशक नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.