अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीचे निकाल राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धक्कादायक ठरले आहेत. ट्रम्प यांच्या पक्षाचा मुख्य निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकींमध्ये दारुण पराभव झाला आहे. एकीकडे ट्रम्प यांचा राजकीय पराभव झाला असला तरी एका व्यक्तीला तब्बल 4200 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे हा एवढा मोठा फटका बसल्याने या व्यक्तीने सोशल मीडियावरील आपली एक पोस्ट डिलिट केली आहे. तरीही या पोस्टचे स्क्रीनशॉट आता व्हायरल होताना दिसत आहेत. या व्यक्तीला ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. नेमका हा प्रकार काय समजून घेऊयात...
कोणासोबत घडला हा प्रकार?
आपण इथे ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, एलॉन मस्क! जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या मस्कने अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी केलेली एक पोस्ट निकालानंतर डिलिट केली आहे. "Vote red today!" (आज लाल रंगाला मतदान करा!) अशी पोस्ट मस्कने त्याच्याच मालकीचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असलेल्या 'एक्स'वर निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी केली होती. हीच पोस्ट आता त्याने शोधून डिलिट केली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा रंग 'लाल' आहे. त्यामुळे मस्कने मतदानाच्या दिवशी मतदारांना रिपब्लिकन पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा मोठा पराभव झाल्यानंतर मस्कने ही पोस्ट काढून टाकली आहे. सध्या जगभरात या हटवलेल्या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
4200 कोटी रुपये खर्च
एलॉन मस्कने अमेरिकेच्या या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तसेच त्यांना जिंकवून आणण्यासाठी स्वतःच्या मालकीचे तब्बल 4200 कोटी रुपये (500 दशलक्ष डॉलर्स) खर्च केले होते. मस्कने एवढा पैसा खर्च करून आणि सोशल मीडियावर उघडपणे पाठिंबा देऊनही मतदारांनी त्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि डेमोक्रॅटिक पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत संसदेच्या दोन्ही सभागृहांवर वर्चस्व मिळवलं आहे.

पाठिंबा दिलेला उमेदवार पराभूत
मस्कने टेक्सासच्या सिनेट निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार केन पॅक्सटन यांच्यासाठी जोरदार मोहीम राबवली होती. मात्र याच ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या जेम्स टॅलारिको यांनी पॅक्सटन यांचा पराभव केला.
त्याने इतर राजकीय पोस्टही केल्या डिलीट
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल समोर येत असताना रिपब्लिकन पक्षाचा पराभव दिसून लागताच मस्कने 'Vote red today!' सह इतर काही राजकीय पोस्ट डिलीट केल्या.