प्रेमप्रकरणातून अपहरणाचा थरार! आई आणि बहिणीला तलवारीने मारहाण करत तरुणीचे अपहरण. पोलिसांसमोरच तरुणीच्या गळ्याला कोयता लावून अर्धा तास थरारक नाट्य सुरू होतं. पोलिसांनी जीवाची बाजी लावत आरोपीला पकडलं असून पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अपहरणाचा थरारक प्रकार समोर आला आहे. बोराडा गावात राहणाऱ्या एका तरुणीच्या घरी जाऊन तिच्या प्रियकराने आई आणि बहिणीवर तलवारीने वार केले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने तरुणीचं बळजबरीने अपहरण केलं. एर्टिगा गाडीतून तरुणीला घेऊन जाताना रस्त्यात आडवे येणाऱ्यांनाही गाडीने उडवलं. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करत अंबाजोगाई येथे गाडी अडवली. मात्र, त्यानंतरही आरोपीने हातातील कोयत्याने तरुणीला धमकावत पोलिसांसमोरच अर्धा तास धिंगाणा घातला. अखेर पोलिसांनी जीवाची बाजी लावत आरोपीला ताब्यात घेतलं. या कारवाईत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. पोलीस कर्मचारी हनुमंत गायकवाड यांच्या धाडसाचं सध्या कौतुक होत आहे
कळंब तालुक्यातील बोराडा गावात घडलेली ही घटना एखाद्या सिनेमातील थराराला साजेशी आहे. आरोपी प्रियकर आपल्या चार साथीदारांसह तरुणीच्या घरी पोहोचला. घरात घुसून तरुणीच्या आई आणि बहिणीला तलवारीने मारहाण केली. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने एर्टिगा गाडीत बसवून अपहरण केलं. तरुणीला घेऊन जाणारी एर्टिगा गाडी कळंब शहरातून सुसाट वेगाने धावत होती. या दरम्यान रस्त्यात आडवे येणाऱ्यांनाही गाडीने धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला
पोलिसांचा पाठलाग थेट अंबाजोगाईपर्यंत सुरू होता. अखेर पोलिसांनी गाडी अडवण्यात यश मिळवलं. मात्र, गाडी थांबल्यानंतरही आरोपीचा थरार संपला नाही. हातात कोयता घेऊन त्याने तरुणीला वेठीस धरलं. एक तर तुला संपवतो, नाहीतर स्वतःला संपवतो, अशी धमकी देत तो पोलिसांनाही जुमानत नव्हता. जवळपास अर्धा तास हा थरार सुरू होता. आरोपीच्या हातात कोयता असल्याने पोलिसांसमोरही मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र, पोलिस कर्मचारी हनुमंत गायकवाड यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आरोपीला पकडण्यासाठी धाडस दाखवलं. या झटापटीत कोयत्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.