सतत थकवा जाणवणे, वजन कमी होणे, पचनाच्या तक्रारी, सततचा खोकला किंवा असामान्य शारीरीक वेदना ही लक्षणे अनेकदा किरकोळ आजारांमुळे होत असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, ही लक्षणे दीर्घकाळ कायम राहत असतील किंवा वारंवार उद्भवत असतील, तर त्यामागचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक लक्षण म्हणजे कर्करोग असे नाही; पण लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. सर्जिकल ऑन्कोलॉजी, टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे डॉक्टर उत्कर्ष आजगावकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कर्करोगाची सुरुवात नेहमीच तीव्र किंवा स्पष्ट लक्षणांनी होते असे नाही. अनेकदा सुरुवातीची लक्षणे ही आम्लपित्त, अपचन, मानसिक ताण, संसर्ग, संप्रेरकांमधील बदल, मूळव्याध किंवा साधा थकवा यांसारख्या सामान्य समस्यांसारखी दिसतात. त्यामुळे ही लक्षणे किरकोळ आहेत, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषतः लक्षणे सौम्य असतील, अधूनमधून जाणवत असतील किंवा घरगुती उपाय आणि नेहमीच्या औषधांनी तात्पुरता आराम मिळत असेल, तर डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते.
कर्करोगाची काही लक्षणे इतर अनेक आजारांमध्येही दिसून येतात. सतत थकवा जाणवणे, भूक मंदावणे, अशक्तपणा, वेदना होणे किंवा वजनात बदल होणे यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे केवळ लक्षणांवरून कर्करोगाचे निदान करणे कठीण असते.
अनेकदा एखाद्या व्यक्तीला आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्यांशी नवीन लक्षणांचा संबंध जोडण्याची सवय असते. उदाहरणार्थ, आम्लपित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला पोट फुगणे किंवा पोटात सतत अस्वस्थता जाणवत असल्यास ती व्यक्ती त्याकडे नेहमीची पचनाची समस्या म्हणून पाहू शकते. त्याचप्रमाणे, दीर्घकाळ खोकला येत असल्यास त्याचे कारण धूळ, प्रदूषण, ॲलर्जी किंवा वारंवार होणारा संसर्ग असल्याचे गृहीत धरले जाते.
काही कर्करोगांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे फारशी तीव्र नसतात. त्यामुळे त्या व्यक्तीची दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू राहतात आणि वैद्यकीय तपासणीस उशीर होतो. काही वेळा औषधे घेतल्यानंतर तात्पुरता आराम मिळाल्यानेही व्यक्तीला काळजी करण्याचे कारण नाही, असे वाटते. मात्र, तीच लक्षणे पुन्हा पुन्हा जाणवत असतील किंवा अनेक आठवडे कायम राहत असतील, तर त्यामागचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे.
वय आणि जीवनशैलीमुळेही लक्षणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पचनासंबंधी समस्या, थकवा, शौचाच्या सवयींमध्ये होणारे बदल किंवा वजन कमी होणे, वाढते वय, कामाचा ताण किंवा बदललेली जीवनशैली यांचा परिणाम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे काही वेळा महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊ शकते.
कोणतीही असामान्य लक्षणं दिसली म्हणजे कर्करोगच आहे, असे नाही. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, सतत वेदना जाणवणे, असामान्य रक्तस्राव होणे, शौचाच्या किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल होणे, गिळताना त्रास होणे, शरीरावर गाठ जाणवणे, दीर्घकाळ खोकला होणे किंवा सतत थकवा जाणवणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
ही लक्षणे कर्करोगाव्यतिरिक्त इतर आजारांमुळेही उद्भवू शकतात. त्यामुळे घाबरून जाण्याऐवजी योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षणे कमी होत नसतील किंवा वारंवार पुन्हा उद्भवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रत्येक लक्षणाबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही; मात्र शरीरात होणारे बदल ओळखणे गरजेचे आहे. शरीर नेहमीपेक्षा वेगळे संकेत देत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास लक्षणांमागील कारण समजण्यास आणि आवश्यक उपचार योग्य वेळी सुरू करण्यास मदत होऊ शकते.