सकाळी उठताच पायाचे तळवे दुखायला लागतात? 'हे' असू शकत कारण, दुर्लक्ष करू नका
अनेकांना सकाळी उठल्यावर पायांच्या तळव्यांमध्ये वेदना जाणवतात. तेव्हा या वेदनेमागचं नेमकं कारण काय असू शकतं आणि या वेदनेपासून सुटका कशी होऊ शकते याविषयी जाणून घेऊयात.
Foot Pain : सकाळी झोपेतून उठताच पायाच्या तळव्यांना वेदना होणे ही अनेक लोकांसाठी एक सामान्य समस्या असेल, पण काहींना मात्र सकाळी उठल्यावर पायाच्या तळव्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात आणि तळव्यांमध्ये ताण किंवा कडकपणा देखील येतो. सुरुवातीला काही पावले चालल्यानंतर ही वेदना कमी होऊ शकते पण बराच वेळ उभे राहिल्यानंतर किंवा चालल्यानंतर वेदना पुन्हा उद्भवत असल्यास, त्याचे मूळ कारण प्लांटर फॅसिटायटिस हे असू शकते. मात्र या मागील कारण हे प्लांटर फॅसिटायटिस असेलच असे नाही पण कधी कधी खूप वेळेपर्यंत असं उभं राहिल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने चपला घातल्याने तसे होऊ शकते. तेव्हा पायाच्या तळव्यांना होणाऱ्या वेदनेवरील उपाय जाणून घेऊयात.
प्लांटर फॅसिआइटिस असू शकतं कारण :
पायाच्या तळव्यात 'प्लांटर फॅशिया' नावाची fibrous tissue असते. हे टिशू टाचेच्या हाडाला पायाच्या बोटांशी जोडते आणि चालताना शरीराचा भार पेलण्यास मदत करते. जेव्हा या टिशूवर वारंवार आणि अतिप्रमाणात ताण पडतो, तेव्हा तिला सूज येऊ शकते आणि तिला किरकोळ नुकसान सुद्धा होऊ शकते. या स्थितीला 'प्लांटर फॅसिटायटिस' असे म्हणतात. सकाळी उठल्यानंतर पहिले पाऊल टाकताना टाचेत किंवा पावलाच्या तळव्यात तीव्र वेदना होऊ शकतात. काही वेळ चालल्यानंतर ही वेदना कमी होऊ शकते परंतु बराच वेळ उभे राहिल्यास ती पुन्हा उद्भवू शकते.
चुकीचे शूज किंवा चप्पल वापरणे:
पायाच्या तळव्यांमध्ये वेदना होण्यामागे चुकीच्या पद्धतीने फुटवेअर घालणे हे देखील कारण होऊ शकते. अतिशय कठीण तळवे, अपुरे कुशनिंग किंवा पायाच्या आर्चला योग्य आधार नसलेल्या चपला वापरल्याने पावलांच्या तळव्यांवरचा ताण वाढतो. विशेषतः दीर्घकाळ उभे राहिल्यास किंवा कठीण जमिनीवर चालल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. हे टाळण्यासाठी अशा प्रकारचे फुटवेअर वापरा जी तळव्यांना पुरेसे कुशनिंग देतात आणि पायाच्या आर्चला आधार देतात.
खूप वेळ उभे राहणं आणि वजन वाढणं :
जर तुम्ही असं काम करत असाल की जिथे खूप काळ दोन पायांवर उभं रहावं लागतं किंवा चालायला लागतं अशावेळी पायांवर अतिरिक्त दबाव पडत असतो. त्याचप्रमाणे शरीराचे वजन वाढल्याने पावलांवर अधिक भार पडतो. यामुळे टाचा आणि तळपायांच्या टिशूंवर अतिरिक्त ताण येतो आणि वेदना होतात. विशेषतः सकाळी या वेदना अधिक जाणवतात. शिवाय अचानक धावण्यास सुरुवात करणे, अतिशय कष्टाचे व्यायाम करणे किंवा दीर्घकाळ शारीरिक हालचाल नसताना अचानक खूप चालणे यांमुळेही पायांच्या तळव्यांना वेदना उद्भवू शकतात.