कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे आणि हा आजार कधीही कोणालाही होऊ शकतो. हा एक गंभीर आजार आहे त्यामुळे अनेकांना या आजाराचे नाव ऐकूनही भिती वाटते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कर्करोग हा जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण असून, 2018 मध्ये यामुळे अंदाजे 96 लाख मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर दरवर्षी 0 ते 19 वर्षे वयोगटातील सुमारे 4,00,000 मुले आणि किशोरवयीन कर्करोगाने ग्रस्त होतात. पण हा आजार लहान मुलांमध्ये का होतो आणि त्याची लक्षणे कोणती आहेत यासंदर्भात तुम्हाला या लेखामध्ये माहिती देणार आहोत.
कॅन्सर आजाराबद्दलची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणे लोकांना दिसत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शरीरात कर्करोगासारखा गंभीर आजार वाढत आहे याची लोकांना जाणीवच राहत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कर्करोग फक्त वृद्ध लोकांनाच होतो, तर तुम्ही चुकत आहात, कारण आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की लहान मुलेसुद्धा या जीवघेण्या आजाराला बळी पडत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला लहान मुलांमधील कर्करोग, तो कसा विकसित होतो, त्याची संभाव्य कारणे कोणती असू शकतात आणि कर्करोगाचे निदान झाल्यावर मुलांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगणार आहोत.
मुलांमधील कॅन्सर होण्याची कारणे कोणती? - प्रौढांच्या तुलनेत, मुलांमधील बहुतेक कर्करोगांची नेमकी कारणे अजूनही अज्ञात आहेत. संशोधनातून असे दिसून येते की मुलांमधील कर्करोगाची फारच कमी प्रकरणे पर्यावरणीय किंवा जीवनशैलीच्या घटकांमुळे होतात.
जेनेटिक हे एक महत्त्वाचे कारण - जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या सुमारे 10% मुलांना आनुवंशिक कारणांमुळे या आजाराचा धोका जास्त असू शकतो.
काही संसर्ग हे देखील धोक्याचे घटक आहेत: एचआयव्ही, एपस्टाईन-बार व्हायरस आणि मलेरिया यांसारख्या काही दीर्घकालीन संसर्गांमुळे मुलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
संशोधनाची गरज: मुलांमध्ये कर्करोग का होतो हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहेत.
मुलाला लघवी करता येत नाही किंवा लघवीमध्ये रक्त येते.
शरीराच्या कोणत्याही भागात कोणतेही स्पष्ट कारण नसताना गाठ, सूज किंवा कडकपणा जाणवणे.
सतत होणारी पोटदुखी किंवा सूज जी कमी होत नाही.
दीर्घकाळ टिकणारी वेदना किंवा वेदनेमुळे रात्री जाग येणे.
कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय येणारे झटके किंवा मुलाच्या वागणुकीत आणि मनःस्थितीत होणारे बदल.
दीर्घकाळ टिकणारी डोकेदुखी.
असामान्यपणे फिकट किंवा पांढरी त्वचा.
मुलाला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो.
वारंवार होणारे संसर्ग किंवा फ्लू सारखी लक्षणे.
कोणतेही स्पष्ट कारण नसताना वारंवार उलट्या होणे.
कोणत्याही कारणाशिवाय जास्त ताप येणे किंवा खूप घाम येणे.
मुलाला धाप लागत आहे किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे.
मुलाचे वजन कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय कमी होते.
त्वचेवर लहान लाल किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके दिसणे.