कर्करोगावरील उपचार अधिक अचूक आणि प्रगत करण्याच्या दिशेने आसाम सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. गुवाहाटी येथे प्रोटॉन बीम थेरपी सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारने बेल्जियमच्या आयबीए समूहाशी सुमारे 600 कोटी रुपयांचा करार केलाय. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील रुग्णांना अत्याधुनिक कर्करोग उपचारांची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या केंद्रासाठी वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्यात मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरचीही मदत घेतली जाणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आसाम सरकारने ३१ ऑक्टोबर रोजी आयबीए पार्टिकल थेरपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत गुवाहाटीतील लोकसेवा भवन येथे हा करार झाला. या प्रकल्पासाठी एकूण 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यापैकी 315 कोटी रुपये जागतिक बँकेकडून, तर 285 कोटी रुपये आसाम सरकारकडून दिले जाणार आहेत. हे केंद्र गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलपरिसरात उभारण्याची योजना आहे.
प्रोटॉन बीम थेरपी ही कर्करोगावरील रेडिएशन उपचारांची प्रगत पद्धत आहे. यात एक्स-रेऐवजी प्रोटॉन कणांचा वापर करून ट्यूमरवर अचूकपणे किरणोत्सर्ग केला जातो. त्यामुळे ट्यूमरच्या आसपासच्या निरोगी अवयवांना होणारे नुकसान तुलनेने कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेषतः मेंदू, मणका किंवा महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ असलेल्या काही प्रकारच्या ट्यूमरमध्ये तसेच बालकांच्या कर्करोग उपचारांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. मात्र, प्रत्येक कर्करोग रुग्णासाठी हीच उपचारपद्धती योग्य असेल असे नाही.
या केंद्रात बेल्जियमच्या आयबीए कंपनीचे ‘ProteusONE’ हे प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. हा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या आसाम राज्य दुय्यम आरोग्य सेवा उपक्रम - सेवा वितरण परिवर्तन म्हणजेच ASSIST अंतर्गत उभारला जाणार आहे.
या अत्याधुनिक यंत्रणेचे संचालन करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, मेडिकल फिजिसिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची गरज असेल. त्यासाठी IBA कडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांना परदेशातील प्रोटॉन थेरपी केंद्रांमध्येही प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. याशिवाय, आसाम सरकारने मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरशी संपर्क साधला आहे. केंद्र सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे.
हे केंद्र उभारण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. आसाममध्ये यापूर्वीच 17 कर्करोग रुग्णालयांचे जाळे विकसित केले जात असून त्यापैकी 12 रुग्णालये कार्यरत आहेत नवीन प्रोटॉन थेरपी केंद्रामुळे या व्यवस्थेला अत्याधुनिक उपचारांची जोड मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सरमा यांनी दिली. विशेष म्हणजे, भारतात प्रोटॉन थेरपीची सुविधा मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या ACTREC येथे आधीपासूनच सरकारी क्षेत्रात उपलब्ध आहे. त्यामुळे आसामचा प्रकल्प हा राज्य सरकारच्या पुढाकारातून उभारला जाणारा पहिला प्रकल्प ठरणार आहे. यामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेत अशा उपचारांचा विस्तार होण्याची शक्यता आहे.